महावितरणच्या वीजबिल वसुलीचा शहरवासियांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:13 AM2021-07-02T04:13:34+5:302021-07-02T04:13:34+5:30
प्रारंभी विद्युत पंपांच्या क्षमतेअभावी शहराला पाणीपुरवठा नियमित करण्यात अडचणी येत होत्या. दोन दिवसाआड होणारा पाणीपुरवठा ५ ते ६ दिवसांआड ...
प्रारंभी विद्युत पंपांच्या क्षमतेअभावी शहराला पाणीपुरवठा नियमित करण्यात अडचणी येत होत्या. दोन दिवसाआड होणारा पाणीपुरवठा ५ ते ६ दिवसांआड होत होता. मात्र, २१ जूनपासून नियोजन करत तो दोन दिवसाआड आणला. मात्र, ‘महावितरण’ने देयकासाठी वीजपुरवठा खंडित केल्याने शहराचा पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत झाला आहे. शहरात पुन्हा ४ ते ५ दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे.
एकीकडे विष्णूपुरी प्रकल्प १०० टक्के भरल्याने प्रकल्पाचे दरवाजे उघडावे लागत आहे. पाण्यासाठी मात्र नागरिकांना वाट पाहावी लागत आहे.
‘महावितरण’च्या कारवाईचा शहरावरील पाणीपुरवठ्यावर गंभीर परिणाम झाला आहे. मोठ्या नियोजनानंतर शहरातील पाणीपुरवठा २ दिवसाआड केला जात होता. मात्र, विद्युत पुरवठ्याअभावी नियोजनावर परिणाम झाला आहे. पुन्हा एकदा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. तो लवकरच पूर्ववत केला जाईल, असे मनपाच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे यांनी सांगितले.
चौकट - मनपाला वेठीस धरू नका : गजभारे
‘महावितरण’च्या भूमिकेचा नगरसेवक बापूराव गजभारे यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. वीजबिलासाठी शहरवासीय आणि मनपाला वेठीस धरण्याचे काम ‘महावितरण’ करत आहे. पाणीपुरवठा व पथदिवे अत्यावश्यक सेवा असून त्या रोखण्याचे काम महावितरण करत आहे. कोरोना संकटात मनपाने सामंजस्याची भूमिका घेत सक्तीने करवसुली केली नाही. परिणामी मनपाचे उत्पन्न घटले आहे. ‘ महावितरणची कार्यालये, वसाहती, सबस्टेशन आदींसाठी वापरण्यात येणाऱ्या मनपा हद्दीतील जागांवर मनपानेही कर आकारावा, अशी मागणी गजभारे यांनी केली आहे. या विषयावर अन्य एकाही नगरसेवकाने प्रतिक्रिया दिली नाही हेही अनाकलनीय आहे.