कुंडलवाडीत महावितरणची वीजबिल वसुली धडक मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:43 AM2021-01-13T04:43:56+5:302021-01-13T04:43:56+5:30
कुंडलवाडी : येथील महावितरणच्या वतीने थकबाकीदारांकडून थकीत वीजबिल वसुलीसाठी धडक मोहीम राबविण्यात आली. यात शहरातील ग्राहकांनी दोन लाख रुपये ...
कुंडलवाडी : येथील महावितरणच्या वतीने थकबाकीदारांकडून थकीत वीजबिल वसुलीसाठी धडक मोहीम राबविण्यात आली. यात शहरातील ग्राहकांनी दोन लाख रुपये भरणा केला, तर एकवीस जणांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वीजबिल वसुली थांबली होती. कुंडलवाडी शाखा कार्यालयांतर्गत वीजबिल थकीतांचा आकडा ७० लाखांच्या घरात पोहोचला होता. हा आकडा वाढतच चालल्याने कर्मचाऱ्यांकडून सोमवारी थकबाकीदार ग्राहकांविरोधात वसुलीसाठी धडक मोहीम राबविण्यात आली. ग्राहकांनी या मोहिमेला प्रतिसाद दिल्याने आज शहरातील काही भागातून दोन लाख रुपयांची वसुली झाली, तर ऑनलाइन पद्धतीने पन्नास हजार रुपयांचा ग्राहकांनी भरणा केल्याने महावितरण कर्मचाऱ्यांनी ग्राहकांचे आभार मानले. तर थकबाकी न भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला.
ही वसुली मोहीम कार्यकारी अभियंता श्रीनिवास चटलावार यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली. यासाठी प्रधान तंत्रज्ञ विठ्ठल गुडले, साईनाथ लोलेवार, अनिल उसलवार, बालाजी तळणे, लक्ष्मण श्रीरामे, धोंडिबा देवणपले, रजनी तेलकेश्वर, मलेश मोतकेवार, निलेश संगेवार, रवी कोरेवार, योगेश शेरीयाल आदी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. वीजबिल भरणा करण्यासाठी महावितरणकडून ग्राहकांना आवाहन करण्यात आले आहे.