मुदखेड बाजार समितीची रणधुमाळी सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 12:49 AM2018-07-12T00:49:17+5:302018-07-12T00:49:47+5:30
मुदखेड कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया १२ जुलैपासून सुरु होत आहे. शेतकरी गटासाठी १५, व्यापारी मतदारसंघात २ आणि हमालमापाडी मतदारसंघात १ अशा १८ सदस्यांना निवडून द्यायचे आहे. ११ आॅगस्ट रोजी मतदान होईल. या निवडणुकीत ८ हजार ७१३ मतदार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : मुदखेड कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया १२ जुलैपासून सुरु होत आहे. शेतकरी गटासाठी १५, व्यापारी मतदारसंघात २ आणि हमालमापाडी मतदारसंघात १ अशा १८ सदस्यांना निवडून द्यायचे आहे. ११ आॅगस्ट रोजी मतदान होईल. या निवडणुकीत ८ हजार ७१३ मतदार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
मुदखेड कृषी उत्पन्न बाजार समितीत एकूण १५ गणांचा समावेश आहे. तसेच व्यापारी मतदारसंघाचे २ आणि हमालमापाडी मतदारसंघाचा एक प्रतिनिधी निवडून द्यायचा आहे. व्यापारी मतदारसंघासाठी १५३ तर हमालमापाडी मतदारसंघासाठी ३३ मतदार आहेत. या निवडणुकीसाठी मुदखेडचे तहसीलदार सुरेश घोळवे यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सहायक निवडणूक अधिकारी म्हणून सहायक निबंधक एस.एन. गाढवे आणि नायब तहसीलदार एस.एस. भोसीकर हे काम पाहतील. निवडणूक निरीक्षक म्हणून भोकरचे उपविभागीय अधिकारी प्रवीण चांडक यांची नेमणूक करण्यात आली आहे.
मुदखेड कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी जवळपास १८ मतदान केंद्र राहणार आहेत. या निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. आचारसंहिता कालावधीत बाजार समितीच्या बाजार क्षेत्रामध्ये कोणत्याही कामाचे उद्घाटन करता येणार नाही. विश्रामगृह वापरासही निर्बंध आहेत. बाजार समिती निवडणुकीच्या कालावधीत बाजार समितीचे सर्व वाहने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या ताब्यात असतील, असेही स्पष्ट करण्यात आले.
यावेळी उपजिल्हाधिकरारी (सामान्य) अनुराधा ढालकरी यांची उपस्थिती होती.
---
नव्या आदेशाने मतदारसंख्येत झाली लक्षणीय वाढ
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी पूर्वी सेवा सहकारी सोसायटीचे संचालक आणि ग्रामपंचायतीचे पंच हेच मतदान करत असत. मात्र नव्या नियमानुसार आता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात असलेल्या सर्व गणांमधील गावातील रहिवासी असलेले शेतकरी. ज्यांच्याकडे १० आर. पेक्षा जास्त जमीन आहे व जे १८ वर्षे पूर्ण करतात, अशा सर्व शेतकºयांना मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. त्यानुसार शेतकºयांची प्रारुप मतदारयादी ६ जून २०१८ रोजी प्रसिद्ध केली. १५ जूनपर्यंत आक्षेप नोंदविले. २९ जून रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
---
निवडणूक कार्यक्रम असा
१२ ते १८ जुलै या कालावधीत नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार आहेत.
छाननी १९ जुलै रोजी होईल.
२० जुलै ते ३ आॅगस्ट हा नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा कालावधी, निवडणूक चिन्हाचे वाटप ४ आॅगस्ट रोजी.
११ आॅगस्ट रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजपर्यंत मतदान.
१२ आॅगस्ट रोजी मतमोजणी