मुदखेडमध्ये सोयाबीनचे भाव पडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2018 12:20 AM2018-10-08T00:20:39+5:302018-10-08T00:21:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
मुदखेड : तालुक्यात व्यापाऱ्यांकडून सोयाबीन पिकाची खरेदी कवडीमोल भावात (भाव पाडून) होत असून शासनाची हमीभावाची अंमलबजावणी कागदावरच असल्याचा अनुभव प्रत्यक्षात शेतक-यांना येत आहे.
बाजारपेठेत व्यापा-यांची मनमानी वाढली असून संबधित यंत्रणेचे याकडे नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे. राज्य सरकारने सोयाबीनसाठी जाहीर केलेल्या हमीभाव संदर्भात अंमलबजावणीवर लक्ष देण्याची यंत्रणाच दिसेनाशी झाल्याने शेतक-यांना गरजे पोटी मिळेल तेच भाव स्वीकारावे लागत आहेत़ भाव पाडून सोयबिन पिकाची खरेदी रोखण्यासाठी संबधित यंत्रणा सक्षम नसल्याने व्यापा-यांचे उखळ पांढरे होत आहे़
शेतक-यांला गरजेपोटी कमी भावात विक्री करावी लागत आहे. राज्य सरकारने सोयबीन, मूग, उडीद, तूर, भात यांसह एकूण १२ पिकांना हमीभाव जाहीर केलेला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतीमालाला व्यापा-यांकडून योग्य हमीभाव मिळावा यासाठी काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिलेले आहेत. जे व्यापारी शेतक-यांच्या मालाला हमीभाव देणार नाहीत, त्यांच्यावर कारवाईचे कागदोपत्री आदेश दिले आहेत. राज्य सरकारने सोयाबीनसाठी प्रतिक्विंटल ३४०० रुपये जाहीर केलेला आहे. जून-जुलै च्या महिन्यात सोयाबीन पेरणी झालेले आता काढणीला आलेले आहे.
मुदखेडसह परिसरातील खांबाला, डोणगाव, मेंढका, शेंबोली, पांढरवाडी, नागेली, बारड, बोरगाव, ईजळी, पाथरड, जवळा, चिकाळा येथे पेरणी केलेले सोयाबिन सध्या कापणीला आले आहे. सोयाबीन खरेदीसाठी व्यापारी व दलालांच्या फेºया वाढल्या आहेत.शेतीमालाला सरकारने जाहीर केलेल्या हमीभावानुसार दर मिळावा यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने कठोर पावले उचलण्याची गरज आहे. सोयाबीनला हमीभाव देण्यासाठी राज्य सरकारने नियम आखून दिले आहेत. व्यापा-यांकडे मॉईश्चर मशिन नसतानाही ते भाव पाडून मागत आहेत. शासनाने प्रत्येक केंद्र सुरू सर्व शेतकºयांचे सोयाबीन खरेदी करणे गरजेचे आहे़
हमीभाव ३४०० ; हाती २९०० रूपये
तालुक्यातील मुख्य म्हणजे मुदखेड आणि बारड, रोहीपिंपळगाव,येथील बाजारात व्यापा-यांनी सोयबीन खरेदीसाठी दुकाने थाटली आहेत. मॉईश्चर, काडी कचरा, काळे डाग अशी कारणे दाखवून व्यापारी शेतक-यांना लुबाडत आहेत.गरिब शेतकरी गरजेपोटी विना पावती सोयाबिन विकत आहेत. सध्या तालुक्यातील मुदखेड, बारड, मुगट, रोहीपिंपळगाव, माळकौठा, पार्डी, वैजापुर, निवघा या भागात सोयाबीनची काढणी सुरू आहे. त्यामुळे व्यापारी आणि दलाल गावागावांत जाऊन सोयाबीनची खरेदी करत आहेत. सोयाबीनचा हमीभाव प्रतिक्विंटल ३४०० रुपये असताना शेतकºयांच्या हातावर २९०० ते ३००० रुपये टेकवले जात आहेत.