मुंबईच्या एनसीबीची नांदेडमध्ये कारवाई; ३५ गोण्यांतील तब्बल ४ कोटींचा गांजा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2021 02:32 PM2021-11-15T14:32:48+5:302021-11-15T14:33:24+5:30
Mumbai NCB's action in Nanded: , नायगाव तालुक्यातील मौजे मांजरम येथे मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या गांजाची वाहतूक होत असल्याची माहिती मुंबई येथील एनसीबी पथकास खबऱ्याने दिली
नांदेड : मुंबई येथील एनसीबीच्या पथकाने नांदेड जिल्ह्यात आज पहाटे ५ वाजेच्या सुमारास नायगाव तालुक्यातील मौजे मांजरम येथे एका ट्रकमधून ( MH26 AD 2165 ) ३५ गोण्यांतील तब्बल ४ कोटींचा गांजा जप्त केला (Mumbai NCB's action in Nanded) . विशाखापट्टणम येथून राज्यात विक्रीसाठी हा गांजा आणण्यात आला होता. याप्रकरणी एनसीबीच्या पथकाची पुढील कारवाई सुरु आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नायगाव तालुक्यातील मौजे मांजरम येथे मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या गांजाची वाहतूक होत असल्याची माहिती मुंबई येथील एनसीबी पथकास खबऱ्याने दिली.यामाहितीवरून एनसीबी पथकाने आज पहाटे मांजरम येथे सापळा लावला. ग्रामस्थ, स्थानिक पोलीस आदींच्या मदतीने पथकाने एक ट्रक ( MH26 AD 2165 ) अडवला. ट्रकची तपासणी केली असता ३५ गोण्यांमध्ये तब्बल ४ कोटींचा गांजा आढळून आला. ही कारवाई एनसीबी अधिकारी अमोल मोरे, सुदाकर शिंदे, संजय गवली, प्रमोद मोरे, कृष्णा पारमदरेकर यांनी केली. तर पथकास गजानन पाटील चव्हाण, सरपंच श्रीकांत नीळकंठ मांजरमकर, पोलीस पाटील जयराज पाटील शिंदे, वसंत शिंदे, इंद्रजीत पटवे, बापूराव पटवे यांच्यासह मांजरम ग्रामस्थांनी मदत केली.
जळगाव येथे एनसीबी पथकाने १५०० किलो गांजा पकडला
मुंबई एनसीबी पथकाने आज पहाटे जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथे १५०० किलो गांजा जप्त केला आहे. एनसीबीच्या पथकाला खबऱ्याकडून टीप मिळाल्यानंतर पोलिसांनी ट्रकमधून वाहतूक करणाऱ्यात येत असलेला गांजा पकडला आहे. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून तब्बल १५०० किलोचा गांजा जप्त करण्यात आला आहे. आंध्र प्रदेशच्या विखाशापट्टणम येथून हा गांजा विक्रीसाठी महाराष्ट्रात आणण्यात आला होता. विशेष म्हणजे, राज्यात विक्रीसाठी नांदेड येथील गांजा सुद्धा विखाशापट्टणम येथूनच आणण्यात आला होता.