मुंडे, बनसोडे पुन्हा की नव्यास संधी? ‘दादां’च्या कोट्यातून मराठवाड्यात मंत्रिपद कोणाला?

By श्रीनिवास भोसले | Published: December 2, 2024 08:04 PM2024-12-02T20:04:47+5:302024-12-02T20:06:12+5:30

पाच जिल्ह्यांत राष्ट्रवादीचे आठ आमदार; महायुती सरकारच्या नवीन मंत्रिमंडळात नव्या अन् तरुण चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याची चर्चा आहे.

Munde, Bansode again or a chance for Navya? Who will get ministerial lottery in Marathwada from 'Dadan' quota? | मुंडे, बनसोडे पुन्हा की नव्यास संधी? ‘दादां’च्या कोट्यातून मराठवाड्यात मंत्रिपद कोणाला?

मुंडे, बनसोडे पुन्हा की नव्यास संधी? ‘दादां’च्या कोट्यातून मराठवाड्यात मंत्रिपद कोणाला?

नांदेड : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कोण होणार? यावर चर्चा चर्वण सुरू असताना मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागणार, याकडेही नजरा लागल्या आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कोट्यातून नवीन चेहऱ्याला संधी मिळणार का? विशेषत: नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यात प्रत्येक एक आमदार अजित पवार यांच्या गटाचा निवडून आला असून, या तिघांपैकी कुणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार याबाबत उत्सुकता आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटाचे राज्यात ४१ आणि मराठवाड्यात आठ आमदार निवडून आले आहेत. महायुतीच्या नव्या सरकारमध्ये राष्ट्रवादीला दहा ते बारा मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर अजित पवार आपल्या कोट्यातून कुणाला संधी देतात, याकडे नजरा लागल्या आहेत. राष्ट्रवादीचे सर्वाधिक तीन आमदार बीड जिल्ह्यात आहेत. यात धनंजय मुंडे (परळी), विजयसिंह पंडित(गेवराई), प्रकाश सोळंके (माजलगाव) नांदेडमध्ये प्रतापराव चिखलीकर (लोहा), परभणी जिल्ह्यात राजेश विटेकर (पाथरी) आणि हिंगोली जिल्ह्यात राजू ऊर्फ चंद्रकांत नवघरे (वसमत) आमदार आहेत. लातूर जिल्ह्यात संजय बनसोडे (उदगीर) व बाबासाहेब पाटील (अहमदपूर) असे एकूण आठ आमदार आहेत. त्यापैकी किमान दोघांना मंत्रिपदाची लाॅटरी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामध्ये बनसोडे आणि मुंडे हे मागील सरकारमध्ये मंत्री होते. त्यामुळे नव्या मंत्रिमंडळात मराठवाड्यातून एका जुन्या अन् एका नवीन चेहऱ्याचा समावेश असेल, असे सांगितले जात आहे.

नांदेड, परभणी, हिंगोलीतून कोण?
भाजपमधून ऐनवेळी राष्ट्रवादीत आलेले प्रतापराव चिखलीकर हे मंत्रिपदासाठी प्रमुख दावेदार मानले जात आहेत. पण त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून घड्याळ बांधले होते. तसेच त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्य मात्र भाजपचाच दुपट्टा घालून आहेत. त्यामुळे दादा त्यांना संधी देतील, याबाबत शंकव आहे. पण फडणविसांचे वजन त्यांच्या पारड्यात पडले तर चिखलीकर मंत्री होऊ शकतात. दुसरीकडे परभणीतील पाथरीचे राजेश विटेकर आणि हिंगोली जिल्ह्यातून पुन्हा आमदार झालेल्या वसमतच्या राजू नवघरे यांचाही विचार केला जाऊ शकतो. त्यात युवा चेहरा म्हणून आणि आजपर्यंत राष्ट्रवादीचे घड्याळ न सोडलेल्या राजू नवघरे यांना प्राधान्य दिले जाण्याची शक्यता अधिक आहे. मराठवाड्यात विशेषत: नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात संघटनात्मक बांधणी आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अजित पवार तीन जिल्ह्यांत एक मंत्रिपद देऊ शकतात.

बनसोडे, मुंडेंना मिळणार का पुन्हा संधी?
महायुती सरकारच्या नवीन मंत्रिमंडळात नव्या अन् तरुण चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. सध्याच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीने बीड जिल्ह्यातून धनंजय मुंडे आणि लातूर जिल्ह्यात संजय बनसोडे यांना मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली आहे. नवीन मंत्रिमंडळात या दोन चेहऱ्यांव्यतिरिक्त आणखीन कोणत्या नव्या चेहऱ्यास दादा संधी देणार आणि जुन्या मंत्र्यांना डच्चू देणार की, पुन्हा संधी हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Web Title: Munde, Bansode again or a chance for Navya? Who will get ministerial lottery in Marathwada from 'Dadan' quota?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.