आभाळ फाटलं; ढगफुटी सदृश्य पावसाने मूग, उडीदाचा झाला चिखल, हातचे पिक गेलं
By प्रसाद आर्वीकर | Updated: September 12, 2023 14:46 IST2023-09-12T14:44:36+5:302023-09-12T14:46:39+5:30
गडगा, मांजरम परिसरात मध्यरात्री एक ते दोन या वेळेत ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस झाला.

आभाळ फाटलं; ढगफुटी सदृश्य पावसाने मूग, उडीदाचा झाला चिखल, हातचे पिक गेलं
गडगा (ता.नायगाव) : नायगाव तालुक्यातील गडगा परिसरात सोमवारी मध्यरात्री वादळी वाऱ्यासह ढगफुटीसदृश्य पाऊस झाला असून, या पावसाने मूग आणि उडीद या पिकांचा अक्षरश: चिखल झाला आहे. तासभराच्या पावसाने पूर स्थिती निर्माण झाली असून, बसस्थानक परिसरातील वस्तीला पाण्याने वेढा घातला होता.
गडगा परिसरात २२ दिवसांपासून पावसाने दांडी मारल्याने पिके ऊन धरत होती. खरीप पिके करपण्याची भिती शेतकरी व्यक्त करीत होते. सोयाबिनचे पीक ऐन फुलोऱ्यात असताना फुलगळ होऊ लागली. त्यातच सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पिकांना जीवदान मिळाले. सोमवारी मध्यरात्री पावसाचा जोर अधिकच वाढला. गडगा, मांजरम परिसरात मध्यरात्री एक ते दोन या वेळेत ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस झाला. या पावसाने काढणीला आलेले उडीद, मूगाचे पिक आडवे झाले आहे. शेतात अक्षरश: पाणी साचले आहे. जमिनीत साचलेल्या पाण्याचा वाफसा होण्यास आणखी दोन-चार दिवस लागणार आहेत. पावसाने मूग- उडीदाचे मोठे नुकसान झाले असून, हे पीक हाती लागणार नसल्याची भिती शेतकरी बोलून दाखवित आहेत.
मांजरम महसूल मंडळातील पिके
ज्वारी २६९ हेक्टर
तूर ४५५ हेक्टर
मुग १९८ हेक्टर
उडीद १८० हेक्टर
सोयाबीन ५९२९ हेक्टर
तीळ १७ हेक्टर
कारळ ११ हेक्टर,
कापूस १४६६ हेक्टर