दिव्यांगांना महापालिका देणार घरकुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:18 AM2021-05-26T04:18:42+5:302021-05-26T04:18:42+5:30

दिव्यांगांचे घरकुलासाठी १ हजार २८ अर्ज झाले आहेत प्रा्प्त नांदेड : शहरातील दिव्यांगाना घरकुल वाटपासाठी अनेक दिव्यांग संघटनांनी आंदोलने ...

Municipal Corporation will provide housing to the disabled | दिव्यांगांना महापालिका देणार घरकुल

दिव्यांगांना महापालिका देणार घरकुल

Next

दिव्यांगांचे घरकुलासाठी १ हजार २८ अर्ज झाले आहेत प्रा्प्त

नांदेड : शहरातील दिव्यांगाना घरकुल वाटपासाठी अनेक दिव्यांग संघटनांनी आंदोलने केली आहेत. या आंदोलनाला आता यश येत असल्याचे स्पष्ट होत असून, महापालिकेने दिव्यांग व्यक्तिंना घरकुल वाटपाचा निर्णय घेतला आहे. यासाठी सर्वसाधारण सभेपुढे प्रस्तावही सादर करण्यात आला आहे. दिव्यांग कल्याण कायदा २०१६ आणि नगरविकास विभागाच्या १० मे २०१८ च्या निर्णयानुसार घरकुल वाटपामध्ये दिव्यांगांसाठी किमान ५ टक्के घरकुल राखीव ठेवण्याची तरतूद आहे. या तरतुदी विचारात घेऊन महापालिकेने शहरातील बेघर दिव्यांग व्यक्तिंना घरकुल मागणीसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन केले होते. महापालिकेला आतापर्यंत १ हजार २८ अर्ज प्राप्त झाले आहेत. या अर्जांची छाननी करून प्राप्त लाभार्थ्यांची यादी अंतिम करण्यासाठी पात्रतेचे निकष ठरविण्यासाठी शहर अभियंता, कार्यकारी अभियंता, सहाय्यक आयुक्त, उपअभियंता यांची समिती स्थापन केली आहे. या समितीने दिव्यांगांना घरकुल वाटपासाठी बारा निकष निश्चित केले आहेत. त्यामध्ये रहिवासी पुरावा, वार्षिक उत्पन्न हे तीन लाखांच्या आत, दिव्यांगांचे प्रमाणपत्र ऑनलाईन असणे आवश्यक, शासनाच्या इतर घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा, लाभार्थी कुटुंबांच्या नावे देशात कुठेही स्वत:चे पक्के घर नसावे, बीएसयुपी नियमानुसार १० टक्के घरकुल हिस्सा भरणे आवश्यक आहे तसेच इतर अटींचा यामध्ये समावेश आहे.

महापालिका हद्दीत केंद्र व राज्य शासनाच्या बीएसयुपी योजनेअंतर्गत पुनर्वसन साईट येथे घरकुल बांधकाम करण्यात आले आहे. श्रावस्तीनगर साईट क्रमांक ३४, गोवर्धनघाट व गौतमनगर, सांगवी या ठिकाणी २६० घरकुल वाटप करणे शिल्लक आहे. या घरकुलांचे दिव्यांग व्यक्तिंना वाटप करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.

चौकट

-------------

सभागृह ठरवणार घरकुल वाटपाचे धोरण

शासन निर्णयाप्रमाणे घरकुल वाटपामध्ये दिव्यांगांसाठी किमान ५ टक्के घरकुल राखीव ठेवण्याची तरतूद आहे. नांदेड शहरातही दिव्यांगांनी घरकुलांची मागणी केली आहे. महापालिकेकडे १ हजार २८ अर्ज प्राप्त झाले असून, उपलब्ध घरकुलांची संख्या पाहता अर्ज जास्त आहेत. त्यामुळे घरकुल वाटपाबाबत धोरण ठरविण्यासाठी सभागृहापुढे प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. २७ मे रोजी होणाऱ्या सभेत याबाबत निर्णय होईल, असे मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी सांगितले आहे.

Web Title: Municipal Corporation will provide housing to the disabled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.