शहरातील नालेसफाईचा मनपाचा दावा, नागरिकांना मात्र भरली धडकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:13 AM2021-06-11T04:13:27+5:302021-06-11T04:13:27+5:30

शहरातील श्रावस्तीनगर, अरविंदनगर, लालवाडी, भीमसंदेश कॉलनी, तेहरानगर, खडकपुरा आदी भागांना प्रभावित करणारा मोठा नाला अद्यापही साफ करण्यात आला नाही. ...

Municipal Corporation's claim of non-sanitation in the city, however, shocked the citizens | शहरातील नालेसफाईचा मनपाचा दावा, नागरिकांना मात्र भरली धडकी

शहरातील नालेसफाईचा मनपाचा दावा, नागरिकांना मात्र भरली धडकी

Next

शहरातील श्रावस्तीनगर, अरविंदनगर, लालवाडी, भीमसंदेश कॉलनी, तेहरानगर, खडकपुरा आदी भागांना प्रभावित करणारा मोठा नाला अद्यापही साफ करण्यात आला नाही. त्याचवेळी या भागात पावसाचे पाणी निचरा होण्यासाठी कोणताही मार्ग नसल्याने नागरिकांना दरवर्षी मोठा फटका बसतो. या भागातील जवळपास ५० हजार नागरिक जास्त पाऊस झाल्यास प्रभावित होतात. शहरातील वसंतनगर, मगनपुरा, नवा मोंढा या भागाला नेहमी फटका बसतो. वसंतनगरात तर अनेक घरातही पाणी शिरते. जुन्या नांदेडातील मालटेकडी, देगलूर नाका या भागातीत सखल नगरांमध्ये पाणी साचते. पांडुरंगनगर, सखोजीनगर, बालाजीनगर हे भागही नाल्यातील पाण्यामुळे प्रभावित होत असतात. शहरातील अण्णाभाऊ साठे चौकात उड्डाणपुलाच्या बाजूला थोड्या पावसानेही रस्ता पाण्याखाली जात आहे. त्यामुळे या पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक ती नालेसफाई झाली नसल्याचेच स्पष्ट झाले आहे.

महापालिकेने शहरात तराेडा-सांगवी या क्षेत्रीय कार्यालयांतर्गत लहान नाले असलेल्या ३३ नाल्यांपैकी सर्वच ३३ नाल्यांची मनुष्यबळाद्वारे सफाई झाल्याचे स्पष्ट केले. तर जेसीबी मशीनद्वारे २१ पैकी १७ आणि पोकलेन मशीनद्वारे ७ पैकी ७ नाले स्वच्छ झाल्याचे सांगितले. अशोकनगर झोनमध्ये ३० लहान नाल्यांपैकी २९, तर मोठ्या १९ नाल्यांपैकी १४ नाले स्वच्छ झाल्याचे स्पष्ट केले आहे.

शिवाजीनगर झोनमध्ये ४२ लहान नाल्यांपैकी ३९, मोठ्या १२ नाल्यांपैकी १२ नाले स्वच्छ केल्याचे सांगितले. वजिराबाद क्षेत्रीय कार्यालयांतर्गत लहान ४१ नाल्यांपैकी ४१, मोठ्या १६ नाल्यांपैकी १५ नाले स्वच्छ झाले. इतवारा झोनमध्ये १७ लहान नाल्यांपैकी १७ व मोठ्या १३ नाल्यांपैकी १३ नाले स्वच्छ झाल्याचे सांगितले. सिडको झोनमध्ये सर्व नाल्यांची स्वच्छता झाल्याचे स्पष्ट केले आहे. येथे लहान १९ आणि मोठे १२ नाले आहेत.

शहरात एकूण १८२ लहान नाल्यांपैकी १७८ नाले मनुष्यबळाद्वारे स्वच्छ झाले आहेत. ४ आणखी शिल्लक आहेत. जेसीबीने स्वच्छ करावयाचे ७० पैकी ६१ नाल्यांची स्वच्छता पूर्ण झाली. तर त्याहून मोठ्या असलेल्या ३० नाल्यांपैकी २९ नाले पोकलेन मशीनद्वारे स्वच्छ करण्यात आले आहेत.

चौकट - पुन्हा आढावा घेऊ - महापौर

शहरातील नालेसफाईच्या कामासंदर्भाने १५ दिवसांपूर्वी आढावा बैठक घेण्यात आली होती. त्यात काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. जवळपास ९० टक्क्यांहून अधिक काम झाल्याचे प्रशासनाने कळवले आहे. काही भागांत काम न झाल्याबाबत आपल्याकडेही तक्रारी प्राप्त झाल्या असून दोन दिवसांत पुन्हा आढावा घेण्यात येणार असल्याचे महापौर मोहिनी येवनकर यांनी सांगितले.

चौकट - स्वच्छता निरीक्षकांची आजच बैठक - उपायुक्त

हवामान खात्याचा तीन दिवस मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी शहरातील स्वच्छता निरीक्षकांची बैठक घेतली. या बैठकीत शहरातील नालेसफाईनंतरच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. आपण स्वत: शहरातील काही भागांची पाहणी केली. कुठेही अडचणी अथवा नागरिकांच्या तक्रारी अद्याप तरी प्राप्त झाल्या नसल्याचे स्वच्छता विभागाचे उपायुक्त शुभम क्यातमवार यांनी स्पष्ट केले.

Web Title: Municipal Corporation's claim of non-sanitation in the city, however, shocked the citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.