मनपाची कर वसुली ५ कोटीने वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 12:36 AM2019-04-02T00:36:47+5:302019-04-02T00:37:15+5:30
ऐन निवडणुकीच्या धामधुमीत महापालिकेने गतवर्षीपेक्षा ५ कोटीहून अधिक कर वसुली केली आहे. विशेष म्हणजे या वर्षी झालेल्या कर वसुलीत पाणी कराचा समावेश नाही.
नांदेड : ऐन निवडणुकीच्या धामधुमीत महापालिकेने गतवर्षीपेक्षा ५ कोटीहून अधिक कर वसुली केली आहे. विशेष म्हणजे या वर्षी झालेल्या कर वसुलीत पाणी कराचा समावेश नाही. तो कर वेगळ्याने वसूल करण्यात आला आहे.
महापालिकेच्या क्षेत्रिय कार्यालय १ ते ६ अंतर्गत तब्बल १२३ कोटी ७१ लाख ८८ हजार रुपयांची थकबाकी आहे. त्यात २०१८-१९ या वर्षाची मागणी ६३ कोटी २६ लाख ८२ हजार इतकी होती. जवळपास १८६ कोटी ९८ लाख ७० हजारांचा वसुलीचा डोंगर महापालिकेला पार करावयाचा होता. त्यात महापालिकेने कर वसुली मोहिमे दरम्यान थकीत असलेल्या रकमेपैकी १९ कोटी १२ लाख १६ हजार रुपयांची वसुली पूर्ण केली तर चालू वर्षातील २७ कोटी १२ लाख ४८ हजार ७८८ रुपये करापोटी वसूल केले आहे. महापालिकेने जवळपास ४७ कोटी रुपयांची वसुली पूर्ण केली आहे.
महापालिकेने केलेल्या कर वसुलीचे प्रमाण हे जवळपास ५० टक्क्यांवर पोहचले आहे. २०१७-१८ मध्ये हेच प्रमाण ४२ टक्क्यांवर होते.
विशेष म्हणजे १० मार्च रोजी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता घोषित झाली. महापालिकेचे निम्याहून अधिक बील कलेक्टर हे निवडणुकीच्या कामामध्ये घेण्यात आले.
त्याचा परिणाम वसुलीवर निश्चितपणे जाणवला. पण असे असतानाही महापालिका आयुक्त लहुराज माळी यांच्या मार्गदर्शनाखाली व उपायुक्त संधु यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी वसुली मोहीम सुरूच ठेवत गत वर्षीपेक्षा ५ कोटीने यंदा कर वसुली अधिकची केली आहे.
या कर वसुलीचा निश्चितच महापालिकेच्या विकास कामांना लाभ मिळणार आहे. त्याचवेळी महापालिका कर वसुलीची आपली मोहीम अशीच सुरू ठेवणार असल्याचे उपायुक्त संधु म्हणाले. महापालिका यंत्रणा निवडणूक कामात गुंतली असल्याने अपेक्षित कर वसुली पूर्ण झाली नाही. परिणामी आगामी आर्थिक वर्षात सुरुवातीपासूनच वसुलीला प्रारंभ केला जाणार आहे. वर्षानुवर्षे कर थकीत असलेल्या मालमत्ता धारकांनी आपल्याकडील कराचा भरणा त्वरित करावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
दरम्यान, महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कर वसुली हाच ं आहे. त्यामुळे कर वसुलीकडे आगामी काळात सातत्याने लक्ष ठेवले जाणार आहे. जप्तीसह अन्य दंडात्मक कारवाई सुरुच ठेवली जाणार आहे.
कर वसुलीत मालमत्ता विभागाचाही मोठा वाटा
महापालिकेच्या या वार्षिक कर वसुलीत मालमत्ता विभागाचाही मोठा वाटा राहिला आहे. महापालिकेने पहिल्यांदाच जाहिरात करातून तब्बल ६९ लाख १ हजार ९५६ रुपये वसूल केले आहे तर तय बाजारीतून ८२ लाख ५१ हजार वाहन तळाच्या कर वसुलीतून ९ लाख ३७ हजार ५०० रुपये तर वार्षिक भाडे वसुलीच्या माध्यमातून १ कोटी १५ लाख १ हजार ८७५ रुपये वसूल करण्यात आले आहे. महापालिकेने भाडे धारकांसाठी अभय योजना राबविली होती. या योजनेलाही चांगला प्रतिसाद मिळाला. जवळपास ६० लाखांची कर वसुली महापालिकेने या योजनेतून केली आहे. विसावा उद्यानाच्या अनामत रक्कमेतून १५ लाख आणि केळी मार्केट येथे ११ लाखांची अनामत प्राप्त झाले आहे. महापालिकेच्या मालमत्ता विभागाकडून थकीत वसुलीसाठी सातत्याने प्रयत्न करण्यात आले. त्या प्रयत्नांना यश आले.
दोन महिन्यात १६ कोटी
२०१७-१८ मध्ये महापालिकेने ४२ कोटी ६५ लाख ५ हजार रुपयांची कर वसुली केली होती. महापालिकेच्या मालमत्ता विभागाचा पदभार उपायुक्त अजितपाल संधु यांनी २ फेब्रुवारी २०१९ रोजी स्वीकारला. त्यावेळी महापालिकेची ३१ कोटींची वसुली पूर्ण झाली होती. त्यानंतर जवळपास दोन महिन्यात उपायुक्त संधु यांनी ही वसुली १६ कोटीने वाढवत मार्च अखेर ४७ कोटींवर वसुलीचे प्रमाण पोहचविले.