चारित्र्यावर संशय घेत पत्नीचा खून करणाऱ्या पतीस जन्मठेपेची शिक्षा
By श्रीनिवास भोसले | Published: August 24, 2022 03:20 PM2022-08-24T15:20:20+5:302022-08-24T15:21:22+5:30
आरोपीने भावाजवळ दिला होता खुनाचा कबुलीजबाब
नांदेड : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन खून केल्याच्या गुन्ह्यातील आरोपीस येथील जिल्हा प्रमुख न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांनी आज जन्मठेप व १० हजार रुपये दंड ठोठावला. मोतीराम तोडसाम असे आरोपीचे नाव आहे.
जशोदा तांडा (थारा)ता. किनवट येथील मोतीराम तोडसाम हा चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीस नेहमी मारहाण करत असे. शेजारीच भाऊ शेषराव राहत असल्याने त्याने अनेकदा मोतीराम यास दारू पिऊ नये असा वारंवार समजून सांगत असे. परंतू मोतीराम दारुच्या आहारी गेल्याने तो कोणाच्या ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. दरम्यान, १० ऑक्टोबर २०१३ रोजी रात्री १ वाजेच्या सुमारास कुत्रे भूंकत असल्याने उठून बाहेर आला. त्यावेळी त्याचा भाऊ शेषराव समोर उभा होता. त्यास त्याने पत्नी लक्ष्मीबाई हिस मारल्याचा कबूली जवाब दिला. त्यानंतर आरोपीचा भाऊ शेषराव यांनी ब-याचवेळ शोधाशोध केल्यानंतर सकाळच्या दरम्यान शेतातील बेसमेंटजवळ एक मृतदेह निदर्शनास आला.
शेषराव यांनी या प्रकरणात मोतीरामनेच पत्नी लक्ष्मीबाईचा रात्री झोपीत गळा दाबून खून केला व जवळच्या चालू असलेल्या बांधकामाजवळ प्रेत फेकून दिले, फिर्याद किनवट पोलीस ठाण्यात दिली. या प्रकरणाचा अधिक तपास करून पोलीस निरीक्षक जगताप यांनी आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. या प्रकरणातील ९ साक्षीदारांची न्यायालयाने तपासणी केली. यानंतर या प्रकरणी जिल्हा प्रमुख न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांनी आरोपी मोतीराम यास जन्मठेप आणि १० हजारांचा दंड ठोठावला. या प्रकरणात सरकारतर्फे ॲड. आशिष गोदंमगावकर यांनी बाजू मांडली.