संगीत शंकर दरबारला उषा मंगेशकर संगीत रजनीने प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 12:49 AM2018-02-26T00:49:41+5:302018-02-26T00:49:41+5:30
संगीत शंकर दरबारच्या पूर्वसंध्येला पार्श्वगायिका उषा मंगेशकर यांच्या संगीतरजनीने गानरसिकांचा आनंद द्विगुणित केला. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या कार्यक्रमास रसिकांनी भरभरुन दाद दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : संगीत शंकर दरबारच्या पूर्वसंध्येला पार्श्वगायिका उषा मंगेशकर यांच्या संगीतरजनीने गानरसिकांचा आनंद द्विगुणित केला. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या कार्यक्रमास रसिकांनी भरभरुन दाद दिली.
२६ व २७ रोजी संगीत शंकर दरबारमध्ये शास्त्रीय, उपशास्त्रीय संगीताचे कार्यक्रम होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज २५ रोजी पूर्वसंध्येला सुगम संगीताचा कार्यक्रम घेण्यात आला. प्रतिवर्षी अशाच प्रकारे महोत्सवाच्या पूर्वसंध्येला सर्वसामान्य रसिकांना रुचेल, अशा प्रकारचा कार्यक्रम घेतला जातो. सायंकाळी ६ वाजता यशवंत महाविद्यालयाच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या संगीत शंकरदरबारच्या मंचावर संगीतरजनीचे उद्घाटन करण्यात आले. शारदा भुवन एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्षा तथा आमदार अमिता चव्हाण व गायिका उषा मंगेशकर यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करुन संगीत रजनीचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी खा. अशोकराव चव्हाण, आ. डी.पी. सावंत, आ. अमरनाथ राजूरकर, स्नेहलताताई हदगावकर, प्रदीपअप्पा पाटील, गुलाबराव भोयर यांची प्रमुख उपस्थिती होती. स्व. शंकरराव चव्हाण व कुसुमताई चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. स्वागतपर प्रास्ताविकात आ. डी.पी. सावंत म्हणाले, संगीत शंकर दरबारचे हे १४ वे वर्ष असून हा संगीत महोत्सव आता केवळ नांदेडचा राहिला नसून मराठवाडा आणि महाराष्ट्रातील एक प्रतिष्ठित मंच म्हणून नावारुपाला आलेला आहे.
पुण्याच्या सवईगंधर्व महोत्सवात येथील कलावंत हजेरी लावत आहेत. शंकर दरबार उपक्रमाच्या संयोजकांचा सवई गंधर्वच्या मंचावर सत्कार होतो, ही बाब नांदेडकरांच्या दृष्टीने अभिमानास्पद आहे. आज मराठवाड्यातील रसिक नांदेडमध्ये कार्यक्रमासाठी येतात. शंकर दरबारची प्रतिष्ठा अवघ्या महाराष्ट्रात झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. स्व. शंकरराव चव्हाण हे शास्त्रीय संगीताचे भोक्ते होते. राजकारणातून उसंत मिळाल्यानंतर ते संगीताचा आनंद घ्यायचे. त्यांच्या ठायी असणारी रसिकता अशोकरावांनी देखील जपली आहे, असे ते म्हणाले. या कार्यक्रमात अभिनेत्री श्रीदेवी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
प्रारंभी संयोजन समितीच्या वतीने संजय जोशी, रत्नाकर अपस्तंभ यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. डॉ. विश्वाधार देशमुख यांनी केले.
लोकप्रिय गीतांचा नजराणा
उषा मंगेशकर संगीत रजनीत सहभागी कलावंतांनी मराठी व हिंदीतील लोकप्रिय गीतांचा नजराणा रसिकांना बहाल केला. उषातार्इंनी ‘माळ्याच्या मळ्यामध्ये कोण गं उभी’, ‘बाई मी केळेवाली मी सांगा तुम्हाला शोभेल का?’ हे गीत ठसक्यात सादर करताना रसिकांनी उत्स्फूर्तपणे दाद दिली. सहगायक जितेंद्र अभ्यंकर यांनी गायिलेल्या ‘डोल मोराच्या मानचा’ या गीताला वन्समोअर झाला. ‘वेडात मराठे वीर दौडले सात’, ‘जय जय शिवशंकर’ ही गीतं सादर केली. ‘मुंगडा मुंगडा’ गीताने बहार आणली. ‘लग जा गले’ हे गीत राधिका अत्रे यांनी अतिशय तन्मयतेने सादर केले. पंजाबी भांगडा’ आणि ‘सैराट’मधील गीताने तर धम्माल उडवून दिली. कार्यक्रमात संवादीनीची संगत डॉ. नरेंद्र चिपळूणकर, गिटारवर मुकेश दिढीया, सिंथेसायजरवर सुरज खान, राजू जगधने, तबला अपूर्व द्रविड, ढोलकी अंकुश बोरडे, ड्रमसेट साथ रोहन बनगे यांची होती. संगीत रजनीचे निवेदन सोनाली श्रीखंडे यांनी केले.