नगरसोल-नरसापूर एक्स्प्रेसला धर्माबादला थांबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 12:58 AM2018-06-28T00:58:08+5:302018-06-28T00:58:30+5:30
नगरसोल-नरसापूर जलद रेल्वेला धर्माबाद रेल्वेस्थानकावर जुलै महिन्यात थांबा मिळणार असल्याचे आश्वासन रेल्वेचे महाव्यवस्थापक विनोदकुमार यादव यांनी दिले़ मंगळवारी सरपंच संघटनेच्या शिष्टमंडळाने त्यांना निवेदन दिले़
लोकमत न्यूज नेटवर्क
धर्माबाद : नगरसोल-नरसापूर जलद रेल्वेला धर्माबाद रेल्वेस्थानकावर जुलै महिन्यात थांबा मिळणार असल्याचे आश्वासन रेल्वेचे महाव्यवस्थापक विनोदकुमार यादव यांनी दिले़ मंगळवारी सरपंच संघटनेच्या शिष्टमंडळाने त्यांना निवेदन दिले़
धर्माबाद येथील रेल्वेच्या प्रलंबित मागण्या गेल्या अनेक वर्षांपासून पूर्ण होत नसल्यामुळे येथील जनतेत रेल्वे प्रशासनाच्या विरोधात तीव्र असंतोष पसरला होता. पालकमंत्री रामदास कदम यांनी मुंबई येथे जिल्ह्यातील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्यावेळेस धर्माबादच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सरपंच संघटनेच्या शिष्टमंडळाने सिंकदराबाद येथे महाव्यवस्थापक विनोदकुमार यांची भेट घेतली़
सदरील शिष्टमंडळात सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष बाबूराव पाटील कदम, माजी उपनगराध्यक्ष रमेशचंद्र तिवारी, शंकर पाटील होट्टे, नगरसेवक भोजराज गोणारकर, छावाचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश पाटील हारेगावकर, पत्रकार संघाचे अध्यक्ष कृष्णा तिम्मापुरे यांचा समावेश होता.
यावेळी महाव्यवस्थापक विनोदकुमार यादव म्हणाले, नगरसोल -नरसापूर जलद रेल्वेस धर्माबादला थांबा मिळावा, यासाठी रेल्वे बोर्डाची मंजुरी घेण्यासाठी प्रस्ताव पाठविला आहे. जुलै महिन्यात रेल्वेस धर्माबादला थांबा मिळणार आहे. निजामाबाद-तिरुपती जलद रेल्वेस नांदेडपर्यंत सोडण्यात यावे, शहरातील रेल्वे ओव्हर ब्रीजचे लवकरच सर्वेक्षण करून ओव्हर ब्रीजच्या मंजुरीसाठी रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचेही विनोदकुमार यांनी शिष्टमंडळाला सांगितले़
नगरसोल-नरसापूर सुपरफास्ट एक्स्प्रेसला धर्माबाद येथे थांबा मिळणार असल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय दूर होणार आहे़ गेल्या अनेक वर्षांपासून याबाबत मागणी करण्यात येत होती़ आता या गाडीला थांबा मिळणार असल्याच्या निर्णयाचे स्वागत होत आहे़