नागपंचमी उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:20 AM2021-08-15T04:20:43+5:302021-08-15T04:20:43+5:30

१३ लोकांवर वीजचोरीचे गुन्हे उमरी - तालुक्यातील अंतर्गत येणाऱ्या बितनाळ, सिंगनापूर, हस्सा या गावातील १३ लोकांनी विद्युत तारेवर आकडा ...

Nagpanchami in excitement | नागपंचमी उत्साहात

नागपंचमी उत्साहात

Next

१३ लोकांवर वीजचोरीचे गुन्हे

उमरी - तालुक्यातील अंतर्गत येणाऱ्या बितनाळ, सिंगनापूर, हस्सा या गावातील १३ लोकांनी विद्युत तारेवर आकडा टाकून वीज चोरी केल्याचे महावितरण विभाग पथकाच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांच्यावर भोकर पोलीस ठाण्यात वीज चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती विद्युत पुरवठा विभागाचे उपकार्यकारी अभियंता व्ही.एम. मठपती यांनी दिली.

गड्डम यांची नियुक्ती

मुखेड - येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखाधिकारीपदी नरेश गड्डम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लातूर येथील शाखेत काम केल्यानंतर त्यांना मुखेड येथील शाखेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नुकताच त्यांनी पदभार स्वीकारला असून यावेळी ग्राहक संघाचे राजू पाटील इंगोले, ॲड.सुनील पऊळकर, समाधान बरगे, जयभीम सोनकांबळे आदी उपस्थित होते.

तलाठी बासरे यांचा सत्कार

धर्माबाद - येथील नगर परिषदेच्या क्षेत्रातील बाळापूर सज्जाचे तलाठी सहदेव बासरे यांनी महसूल विभागात उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर त्यांचा जिल्हाधिकारी विपीन इटणकर यांच्या हस्ते गौरव करून प्रशस्तीपत्र देण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी कुलकर्णी, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर आदी उपस्थित होते.

पावसाअभावी पिके सुकली

कुरुळा - मागील काही दिवसापासून पावसाने दडी मारल्यामुळे या भागातील पिके पिवळी पडत आहेत. दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत असून पिके करपून जात आहेत. सोयाबीनवर चक्री भुंगा, पांढरी माशी, तुडतुडे, केसाळ अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे तर कापसावर मावा राेगाचा प्रादुर्भाव दिसत आहे.

उस्माननगरात नाल्या तुंबल्या

लोहा - उस्माननगर ग्रामपंचायत इमारतीजवळ अंगणवाडीसमोर घाण पाणी तुंबल्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून या पाण्याचा निचरा करण्याची मागणी होत आहे. या ठिकाणी नाल्या तुंबल्यामुळे डासांचाही मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. कोरोना काळात स्वच्छतेकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.

सोयाबीन पिके धोक्यात

बरबडा - नायगाव तालुक्यातील सोयाबीन, मूग, कापूस पिके पावसाअभावी सुकून जात आहेत. गेल्या काही दिवसापासून पाऊस पडत नसल्यामुळे पिकांनी माना टाकल्या आहेत. येत्या दोन-तीन दिवसात पाऊस न पडल्यास शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी येणारा घास जाण्याची शक्यता आहे. शासनाने या भागातील शेतकऱ्यांच्या पिकांचे सर्वेक्षण करून आर्थिक मदत करावी, अशी मागणी होत आहे.

बोधडीत नागरिकांचे आरोग्य धोक्यात

बोधडी - मागील काही दिवसांपासून गावात डासांचे प्रमाण वाढल्यामुळे डेंग्यू, मलेरिया यासारख्या आजारांचा फैलाव होत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयाकडून धूर फवारणीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी होत आहे. सध्या पाऊस नसल्यामुळे तापमानात वाढ झाली आहे. या विचित्र वातावरणात डासांची मोठ्या प्रमाणात वाढ होऊन डेंग्यूचे रुग्णही वाढले आहेत.

आदिवासी कोळी समाजाची मागणी

बिलोली - औरंगाबाद येथे अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्राचे अस्तित्व नाकारून अन्याय करण्यात येत असल्याचे निवेदन आदिवासी महादेव कोळी समाज संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. सदरील समिती जाणिवपूर्वक भेदभाव करीत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. दोन जमातींना वैधता प्रमाणपत्र मिळू द्यायचे नाही या मानसिकतेतून समिती काम करीत असल्याचा आरोप संघटनेच्या सदस्यांनी केला.

शिष्यवृत्ती परीक्षा सुरळीत

बाऱ्हाळी - पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा येथील दोन केंद्रावर सुरळीत पार पडली. या केंद्रावर परिसरातील माध्यमिक शाळेतील ११६ विद्यार्थी परीक्षेला बसले हाेते. त्यापैकी १०६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. केंद्र संचालक म्हणून एस.आर.राठोड यांनी काम पाहिले. तसेच विद्याविकास विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर ८० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या केंद्रावर केंद्र संचालक म्हणून व्ही.टी.कोंडे यांनी काम पाहिले.

जंगलाच्या बाजूने जाळे बसवा

भोकर - हिंस्त्र प्राण्यांकडून शेतकऱ्यांच्या पिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी जंगलाभोवती जाळे बसविण्याचे काम हाती घ्यावे, अशी मागणी डॉ. शंकरराव चव्हाण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामचंद्र मुसळे यांनी निवेदनाद्वारे केली. तालुक्यात मोठ्या प्रमाणात वनसंपदा आहे. जंगलात रोही, रानडुक्कर, मोर, हरीण यासारखे प्राणी मुक्तपणे वावरतात. तालुक्यातील शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन, ज्वारी आदी पिके घेतली आहेत.

Web Title: Nagpanchami in excitement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.