नमनालाच यंत्रणा कोलमडली, स्वारातीम विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:21 AM2021-07-14T04:21:39+5:302021-07-14T04:21:39+5:30
नांदेड- स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्यावतीने उन्हाळी २०२१ परीक्षा ऑनलाईन घेण्यास मंगळवारपासून प्रारंभ झाला होता; परंतु पहिल्याच दिवशी ऑनलाईन यंत्रणा ...
नांदेड- स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्यावतीने उन्हाळी २०२१ परीक्षा ऑनलाईन घेण्यास मंगळवारपासून प्रारंभ झाला होता; परंतु पहिल्याच दिवशी ऑनलाईन यंत्रणा कोलमडल्याने हजारो विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाहीत. परिणामी विद्यार्थ्यांचा रोष आणि तांत्रिक बाब लक्षात घेता सर्वच परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय स्वारातीम विद्यापीठात रात्री उशिरा झालेल्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मार्च-एप्रिलमध्ये होणाऱ्या उन्हाळी परीक्षा स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्यावतीने पुढे ढकलण्यात आल्या होत्या. दरम्यान, कोरोना रुग्णांची संख्या घटल्याने या परीक्षा जुलै महिन्यात ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला होता. त्यानुसार बीए, बीकॉम, बीएस्सी या अभ्यासक्रमाच्या परीक्षांना मंगळवारपासून प्रारंभ झाला; परंतु पहिल्याच दिवशी सकाळी १० वाजता सुरू होणारी परीक्षा ११ वाजेपर्यंतही होऊ शकली नाही. या परीक्षा ऑनलाईन असल्याने बहुतांश विद्यार्थ्यांना पाठवण्यात आलेल्या लिंकला क्लिक करूनही काहीही पर्याय येत नव्हता. त्याचबरोबर ग्रामीण भागात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नेटवर्किंगच्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे ऑनलाईन परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. अनेक विद्यार्थ्यांचा पेपर सोडवून झाला; परंतु सबमीट होऊ शकला नाही, तर काही विद्यार्थ्यांना पेपरची लिंकच ओपन होऊ शकली नाही. या संदर्भात सकाळी १० वाजेपासूनच विद्यापीठाकडे तक्रारी येण्यास सुरुवात झाल्याने विद्यापीठ प्रशासनाने रात्री उशिरा परीक्षा मंडळाची बैठक बोलावली. या बैठकीमध्ये तांत्रिक बाबींचा विचार करून, तसेच विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही, या उद्देशाने मंगळवारी झालेल्या पेपरसह पुढील सर्व पेपर काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आले आहेत.
चौकट--------------
विद्यार्थ्यांचे शैक्षिणक नुकसान होणार नाही यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे. कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या उपस्थितीत झालेल्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये पदवी, पदव्युत्तर व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या २० जुलै, २६ जुलैपासून सुरू होणाऱ्या अंतिम वर्षाच्या परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सुधारित वेळापत्रक लवकरच कळविण्यात येईल; परंतु महाविद्यालय स्तरावर क्लस्टर पद्धतीने होणाऱ्या परीक्षेच्या तारखेत व वेळेत कुठलाही बदल नाही.
- डॉ. रवी सरोदे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, स्वारातीम विद्यापीठ, नांदेड.
चौकट-------------
विद्यापीठाच्यावतीने १३ जुलै रोजी आयोजित परीक्षा ऑनलाईन पद्धतीने ९५ टक्के विद्यार्थी देऊ शकले नाहीत. विद्यापीठाची ऑनलाईन परीक्षा यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरली आहे. शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे ही परीक्षा रद्द करून विद्यापीठ प्रशासनाने नव्याने ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षा घ्याव्यात. त्यासाठी नव्याने वेळापत्रक जाहीर करावे.,
- प्राचार्य डॉ. पंजाब चव्हाण, सचिव- प्राचार्य कल्याण संघ, स्वारातीम विद्यापीठ, नांदेड.