सरकारी कार्यालयांत आचारसंहिता नावालाच; काम कमी अन् कर्मचाऱ्यांच्या कानाला मोबाईल जास्त !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:08 AM2021-08-02T04:08:05+5:302021-08-02T04:08:05+5:30
नांदेड : आजकाल सर्वांच्याच हातात ॲन्ड्राईड मोबाईल आले आहेत. सोशल मीडियावरही अनेकजण ॲक्टिव्ह आहेत. त्यांत सरकारी कार्यालयांत काम करणारे ...
नांदेड : आजकाल सर्वांच्याच हातात ॲन्ड्राईड मोबाईल आले आहेत. सोशल मीडियावरही अनेकजण ॲक्टिव्ह आहेत. त्यांत सरकारी कार्यालयांत काम करणारे अधिकारी आणि कर्मचारीही आले; परंतु कार्यालयात असताना अनेक अधिकारी आणि कर्मचारी लोकांची कामे करण्यापेक्षा तासन्तास मोबाईलमध्ये व्यस्त असतात. अनेकजण तर व्हिडिओ कॉलवर असल्याचे दिसून आले. त्यामुळे कार्यालयीन शिस्तीचा भंग होत आहे.
कार्यालयीन कामासाठी केवळ कार्यालयीन दूरध्वनीचा वापर करावा. कार्यालयीन वेळेत कार्यालयीन कामासाठी आवश्यक तेव्हाच मोबाईलचा वापर करावा. मोबाईलवर सौम्य आवाजात बोलावे, वाद घालू नये. कार्यालयीन कामासाठी मोबाईलचा वापर करताना टेक्स्ट मेसेजचा वापर करावा. मोबाईलवर आलेले अत्यावश्यक वैयक्तिक कॉल बाहेर जाऊन घ्यावेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात कोणत्याही विभागात गेल्यानंतर अनेकांच्या माना या मोबाईलमध्येच असल्याचे दिसून येते. टेबलवर फाइलींचा गठ्ठा पडलेला असताना त्याकडे त्यांचे लक्षही जात नाही. कामासाठी आलेली व्यक्ती समोर असताना त्याच्याशी बोलणेही टाळले जाते.
जिल्हा परिषदेत पुरुष आणि महिला कर्मचारी आपली खुर्ची सोडून पोर्चमध्ये उभे राहत मोबाईलवर बोलण्यात व्यस्त असतात. तसेच त्यांचा अधिक वेळ कँटीनमध्येच जातो. या ठिकाणीही सोशल मीडियावर चॅटिंगमध्ये वेळ घालण्यात येतो. त्यामुळे खुर्ची रिकामी दिसल्याने कामासाठी आलेले नागरिक परत जातात.