नाव, सातबारा शेतकऱ्याचा; पैसा जातोय केंद्र चालकांच्या खात्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2023 09:03 AM2023-08-08T09:03:32+5:302023-08-08T09:03:44+5:30
चार केंद्रांवर प्रकार उघडकीस, अस्मानीने मारले अन् सुलतानीने लुबाडले
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : राज्य शासनाने एक रुपयात पीक विम्याची घोषणा केली. परंतु अनेक सीएससी केंद्र चालकांनी परस्परच अनेक शेतकऱ्यांचा पीक विमा भरून विम्याची रक्कम आपल्या बँक खात्यात वळती करण्याचा प्रयत्न केला आहे. अशी चार केंद्र सध्या निष्पन्न झाली आहेत.
मागील आठवड्यात दोन वेळेस अतिवृष्टी झाली. अद्याप ती नुकसान भरपाई मिळाली नाही. दुबार पेरणीचे संकट असताना आता पीक विमा भरणा केंद्र चालकांकडून शेतकऱ्यांना गंडविण्याचा प्रकार समोर आला आहे.
पीक विमा भरण्याची मुदत संपल्यानंतरही जवळपास ३० हजारांवर शेतकरी विमा भरुच शकले नाहीत. विशेष म्हणजे यातील हजारो शेतकऱ्यांच्या नावाने केंद्र चालकांनीच त्यांचा सातबारा आणि इतर कागदपत्रांचा वापर करुन एक रुपयाच्या शुल्काद्वारे विमा भरला.
३० हजारांवर शेतकऱ्यांच्या तक्रारी
पीक विमा कंपनीकडे जवळपास ३० हजारांवर शेतकऱ्यांनी तक्रारी केल्याची माहिती आहे. यावरून जिल्ह्यातील अनेक सीएससी केंद्र चालकांनी अशाच प्रकारे बोगसपणा केल्याचे दिसून येते. सर्व तक्रारींची खोलात जाऊन चौकशी केल्यास मोठा घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता आहे.
केंद्र चालक रातोरात शेकडो एकरचा मालक
कंधार शहरातील एका केंद्र चालकाला केवळ दीड एकर शेती आहे. या केंद्रावर जवळपास ६०० शेतकऱ्यांचा पीक विमा काढण्यात आला. त्यातील १६० शेतकऱ्यांचा विमा या केंद्र चालकाने परस्पर काढला असून तशी कबुलीही त्याने दिली. संबंधित १६० शेतकरी पीक विम्याच्या रकमेला मुकणार आहेत.
बँक खाते क्रमांक आपले किंवा नातेवाइकांचे टाकले. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या नावे पीक विमा आला तरी, तो थेट केंद्र चालक किंवा त्यांच्या नातेवाइकांच्या खात्यात जमा होणार आहे. या ऑनलाइन लुटीबाबत शेतकरी मात्र अनभिज्ञ आहेत.
शेतकऱ्यांच्या नावे परस्पर पीक विमा भरणारी जिल्ह्यातील चार केंद्र निष्पन्न झाली आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी संबंधित विमा कंपनीला कळविण्यात आले आहे.
- भाऊसाहेब बार्हाटे,
जिल्हा कृषी अधीक्षक