किनवट तालुक्यातील प्रकल्पीय क्षेत्र नावालाच; ४५ टक्के क्षेत्रच सिंचनाखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:17 AM2021-02-14T04:17:23+5:302021-02-14T04:17:23+5:30
किनवट या डोंगराळ तालुक्यातील शेती सिंचनाखाली यावी या उद्देशाने काही चाळीस, काही तीस व काही वीस-पंचवीस वर्षांपूर्वी प्रकल्पाची निर्मिती ...
किनवट या डोंगराळ तालुक्यातील शेती सिंचनाखाली यावी या उद्देशाने काही चाळीस, काही तीस व काही वीस-पंचवीस वर्षांपूर्वी प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर प्रकल्पीय क्षेत्र ठरवून देण्यात आले. त्यासाठी मोठा खर्च करून कॅनॉल व चरी काढण्यात आल्या; पण शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत तलावाचे पाणी पोहोचत नसल्याने आजही शेवटच्या शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ मिळाला नाही. काही प्रकल्पाच्या खाली चार टक्के, काही नऊ टक्के, तर काही पंधरा टक्के, सरासरी पंचेचाळीस टक्केच क्षेत्र सिंचनाखाली आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रकल्प निर्मितीचा उद्देश सफशेल अपयशी ठरल्याचे किनवट तालुक्यातील चित्र आहे
२१ प्रकल्पांच्या खालील नऊ हजार ४१३ हेक्टर शेत जमीन ओलिताखाली यायला हवी असताना गतवर्षी रब्बी हंगामात चार हजार १९१ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आल्याचे मोजणीअंती दिसून आले. त्यामुळे पंचावन्न हेक्टर क्षेत्र आजही ओलिताखाली आले नसल्याने व कॅनॉल दुरुस्ती करण्याचे काम अधूनमधून हाती घेऊनही शेवटच्या शेतकऱ्यांना पाणीच मिळत नसल्याने प्रकल्प निर्मितीचा उपयोग काय ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
प्रकल्पीय क्षेत्र व प्रत्यक्षात गतवर्षी भिजलेले कंसातील क्षेत्र याप्रमाणे नागझरी ९६३ (४३६), लोणी १ हजार ३७६ (६९०), डोंगरगाव ८३० (६२५), पिंपळगाव (कि) ४०५ (१३५), निचपूर ४६६ (१६०), सिंदगी २५० (४०), अंबाडी १७२ (१६), सिरपूर ४२७ (३९८), वरसांगवी ४८६ (१४६), पिंपळगाव (भि) ४८६ (८१), मांडवी ६८८ (२५०), सावरगाव २९४ (१६७), जलधरा ३६६ (१६७), मुळझरा ६६३ (१५१),थोरा १६९ (४०), हुडी ३५३( ६१.८०), नंदगाव ३२३ (१५), कुपटी २७५ (१२), सिंदगी साठवण तलाव ३२४ (३७), निराळा ३२० (४१), केवळ सिरपूर या बृहत तलावाखालील सिंचन हे नव्वद टक्केपेक्षा जास्त झाल्याचे दिसून येत आहे. तरीही या प्रकल्पाच्या खालील नाल्यांना पाणी सोडून नासाडी केली जाते, तर बऱ्याच प्रकल्पाच्या खालील कॅनॉलमधून पाण्याची नासाडी होत असल्याचे दरवर्षीचे चित्र आहे. ज्या शेतातून कॅनॉल गेले, ते बरेच कॅनॉल पाण्याच्या प्रतीक्षेत अजूनही आहेत.