नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पासाठी कंधार तालुक्यातील ३० गावांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2018 12:26 AM2018-02-04T00:26:44+5:302018-02-04T00:26:55+5:30
डॉ. गंगाधर तोगरे। लोकमत न्यूज नेटवर्क कंधार: राज्य शासन जागतिक बँकेच्या अर्थसाह्याने महाराष्ट्रातील १५ जिल्ह्यांतील शेतीपीक उत्पादन व उत्पन्न ...
डॉ. गंगाधर तोगरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
कंधार: राज्य शासन जागतिक बँकेच्या अर्थसाह्याने महाराष्ट्रातील १५ जिल्ह्यांतील शेतीपीक उत्पादन व उत्पन्न वाढीसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबविणार आहे. त्यातून शेतक-यांना सक्षम केले जाणा असून त्यात कंधार तालुक्यातील ३० गावांची निवड करण्यात आली आहे. हवामान बदलाच्या परिस्थितीशी जुळवून घेऊन हा प्रकल्प राबविला जाणार असल्याने निवड झालेल्या गावांतील शेतक-यांची प्रगती साधण्याची संधी उपलब्ध झाल्याचे मानले जात आहे.
सतत नापिकी, दुष्काळ, पीक उत्पादनाची घसरण आदीने शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. हवामान बदलाने शेती क्षेत्र प्रभावित झाले आहे. हवामान बदलाची व्यापकता वाढण्याची व शेती, भूगर्भातील पाणीसाठा, जमिनीचे आरोग्य धोक्यात येत असल्याचे तज्ज्ञांच्या अहवालातूनही भिती व्यक्त करण्यात आली आहे. दुष्काळ, नापिकीला सातत्याने सामोरे जावे लागत आहे. हवामान बदलाने निर्माण होत असलेल्या परिस्थितीशी जुळवून घेऊन पीक उत्पादकतेत वाढ करणे, उत्पादकता क्षमता वाढवून शेतक-यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने जागतिक बँकेच्या अर्थसाह्याने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला. हा प्रकल्प राज्यातील १५ जिल्ह्यांत निवडक गावांत राबविला जाणार आहे. त्यात नांदेड जिल्ह्यातील ३८४ गावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये कंधा तालुक्यातील ३० गावे प्रकल्पासाठी निवडण्यात आली आहेत.
तालुक्यातील आलेगाव, औराळ, बामणी (पक), बिंडा, चिखली, दहीकळंबा, दाताळा, दिंडा, गुंडा, हिस्से औराळ, हाळदा, मंगलसांगवी, नंदनवन, सावळेश्वर, देवयाचीवाडी, गोणार, जाकापूर, कल्हाळी, पेठवडज, रुई, सावरगाव (नि), शिर्शी बु, शिर्शी खु, येलूर, बाचोटी, चौकी धर्मापुरी, चिंचोली (पक), गोगदरी, मजरे वरवंट, चौकी महाकाया या गावांचा समावेश आहे.
या गावांत येत्या सहा वर्षांत तीन टप्प्यांत या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या गावातील गरजानुसार पाणलोट आधारित जलसंधारण, पाणी उपलब्धतेसाठी विहीर, पाणी साठवण्यासाठी शेततळे, खारपण जमिनीचे व्यवस्थापन, जमिनीतील कर्बग्रहण प्रमाण वृद्धीसाठी रोपे व फळबाग लागवड, हवामान अनुकूल कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार, पाणी कार्यक्षम वापरासाठी ठिबक व तुषार सिंचन, शेतकरी उत्पादक गटांना व्यवसायासाठी अर्थसहाय्य, कृषी व हवामान विषयक सल्ला, शेतकरी प्रशिक्षण व अभ्यास दौरे आदी उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. यासाठी गाव व गाव समूहाचा सुक्षम नियोजन आराखडा लोकांच्या सहभागातून केला जाणार आहे. त्यात पाणी ताळेबंद, जमिनीचे आरोग्य, शेती, शेती उत्पादन, उत्पन्न व शेतीपूरक व्यवसाय समस्या, गरजा व संधी याचा आराखड्यात समावेश राहणार आहे.
कृषी विभागामार्फत हा प्रकल्प राबविला जाणार असून याची अंमलबजावणी करण्यासाठी गावच्या सरपंचाच्या अध्यक्षतेखाली ग्राम कृषी संजीवनी समितीचे गठण होणार आहे. या प्रकल्पातील बाबीसाठी सध्या कृषी विभागाकडून राबविण्यात येणाºया विविध योजनांत असलेल्या अनुदान मर्यादा, प्रचलित मापदंड व निकष लागू राहणार आहेत. समितीकडे अर्ज सादर करायचा असून निवड ही समितीच करणा आहे. लाभार्थी निवड करताना अत्यल्प भूधारक (अनु. जाती, अनु. जमाती, महिला, दिव्यांंग) व अल्प भूधारक (अनु. जाती, अनु. जमाती, महिला, दिव्यांग), शेतकरी असा प्रधान्यक्रम राहणार आहे.
लाभार्थी निवड झालेल्या शेतक-यांनी घटकाची उभारणी केल्यानंतर पूर्वतपासणी करुन देय अनुदान डीबीटी पद्धतीनुसार करण्यात येणार आहे. सदर प्रकल्पातून शेती व शेतक-यांचे हित किती प्रमाणात होणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणा आहे.
शेतक-यांचे योगदान महत्वाचे...
प्रकल्पाची माहिती ग्रामसभेतून दिली. जनजागरण, मार्गदर्शनपर भर देण्यात आला आहे. पीक पद्धतीत बदल करणे, हवामानाच्या विषम घटकांना सहन करणा-या पीक व पिकाच्या वाणांची निवड करणे, यातून पिकांचे होणारे नुकसान कमी करणे हा प्रकल्पाचा उद्देश राहील. यात सहभागी शेतक-यांचे योगदान महत्वाचे राहणार आहे. संजय गायकवाड,तालुका कृषी अधिकारी