गेल्या तीन पिढ्यांपासून शिरड गावात नांदतेय एकत्र कुटुंब पद्धती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:17 AM2020-12-22T04:17:52+5:302020-12-22T04:17:52+5:30
शिरड, ता. हदगाव येथील वरठी (परीट) समाजाचा दरणे परिवार मागील तीन पिढ्यांपासून गुण्यागोविंदाने एकत्र नांदत आहे. मोलमजुरी करून दरणे ...
शिरड, ता. हदगाव येथील वरठी (परीट) समाजाचा दरणे परिवार मागील तीन पिढ्यांपासून गुण्यागोविंदाने एकत्र नांदत आहे. मोलमजुरी करून दरणे कुटुंब संसाराचा गाडा हाकतात. या संसाराला हातभार लावण्याकरिता त्यांना थोडी शेतीही आहे.
अवधूत दरणे यांची पहिली पिढी मोलमजुरी करून गुजराण करीत होती. त्यांना चार मुलं, दोन मुली. सर्वांची लग्नं झालीत. संसाराचा गाडा हाकता हाकता वृद्धापकाळाने त्यांचे ३० वर्षांपूर्वी निधन झाले. त्यांच्या निधनापूर्वीच घरचा कारभार त्यांचा मोठा मुलगा वामनराव दरणे म्हणजे दुसरी पिढी यांच्याकडे संसाराची सूत्रे आली. संसार सुखाचा चालत असताना वामन दरणे यांचे दोन भाऊ बाजीराव व दतराव यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. यामुळे कारभारी असलेले वामन दरणे यांची हिंमत खचली तर वामन दरणेंना दोन मुले. त्यांनी त्यांचा मोठा मुलगा म्हणजे तिसरी पिढी अशोक दरणेंकडे घर संसाराचा कारभार दिला.
आजघडीला नातू, पणतू, सासवा, सुना, जावा, दीर असा एकूण २५ जणांचा परिवार मागील तीन पिढ्यांचे साक्षीदार गुण्यागोविंदाने नांदत आहेत. अद्याप त्या परिवारात कुणाचाच वाद किंवा भानगड झाल्याचे ऐकण्यात नाही.