चालू शैक्षणिक वर्षातच नांदेडला कृषी महाविद्यालय, ६० विद्यार्थ्यांना दिला जाणार प्रवेश
By प्रसाद आर्वीकर | Published: October 14, 2023 02:03 PM2023-10-14T14:03:14+5:302023-10-14T14:04:06+5:30
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे घेण्यात आलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नांदेड येथे शासकीय कृषी महाविद्यालय स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली होती.
नांदेड : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत नांदेड येथे नवीन शासकीय कृषी महाविद्यालय स्थापन करण्यात येत असून, चालू शैक्षणिक वर्षातच या महाविद्यालयात ६० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे घेण्यात आलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नांदेड येथे शासकीय कृषी महाविद्यालय स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली होती. या मंजुरीनंतर १२ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्य व्यवसाय विभागाने आदेश काढून या महाविद्यालयात चालू शैक्षणिक वर्षापासून ६० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास मंजुरी दिली आहे. नांदेड येथे कृषी महाविद्यालय सुरू होणार असल्याने कृषी क्षेत्रात करिअर करण्याची संधी असणाऱ्या विद्यार्थ्यांना पदवी शिक्षणासाठी जिल्ह्याबाहेर जाण्याची आवश्यकता भासणार नाही. दरम्यान, या कृषी महाविद्यालयासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ आणि इतर सुविधा उपलब्ध झाल्यानंतर विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया राबविण्याचे निर्देश शासन आदेशात देण्यात आले आहेत.
३० हेक्टर जमिनीची आवश्यकता
नांदेड येथे शासकीय कृषी महाविद्यालय स्थापन करण्यासाठी भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या निकषानुसार ३० हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत नांदेड जिल्ह्यात कृषी तंत्र विद्यालयांतर्गत ५२ हेक्टर, कापूस संशोधन केंद्रांतर्गत बाफना टी पॉईंट येथे ३६.३३ हेक्टर व धनेगाव फार्म येथे १७.४० हेक्टर अशी १०५.७३ हेक्टर जमीन कृषी विद्यापीठाकडे उपलब्ध आहे. यातून कृषी महाविद्यालयासाठी ३० हेक्टर जमीन उपलब्ध होणार आहे.
८८ पदांना मिळाली मंजुरी
या कृषी महाविद्यालयाला नवी दिल्लीच्या भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने ८८ पदांना मान्यता दिली आहे. त्यामध्ये ४१ पदे हे शिक्षकीय असतील तर ४३ पदे शिक्षकेतर राहणार आहेत. उच्चस्तरीय सचिव समितीची या पदांना मान्यता घेतली जाणार आहे.