नांदेडमधील एटीएम फोडणारी चोरट्यांची टोळी बुलढाण्यात जेरबंद; नागपूर येथील ३ एटीएम फोडल्याचीही दिली कबुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 05:29 PM2018-06-27T17:29:20+5:302018-06-27T17:35:16+5:30
भाग्यननर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राज कॉर्नर आणि भावसार चौक या ठिकाणच्या एसबीआय बँकेच्या दोन एटीएम मशीन्स फोडुन चोरटयांनी सोळा लाख रुपये लंपास केले.
नांदेड : भाग्यननर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राज कॉर्नर आणि भावसार चौक या ठिकाणच्या एसबीआय बँकेच्या दोन एटीएम मशीन्स फोडुन चोरटयांनी सोळा लाख रुपये लंपास केले. मंगळवारी मध्यरात्री हि घटना घडली. दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यात नाकाबंदीमध्ये चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले असून त्यांनी नागपूर येथील एटीएम फोडीची कबुली दिली आहे.
या बाबत अधिक माहिती अशी कि, मंगळवारी मध्यरात्री भाग्यननर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राज कॉर्नर आणि भावसार चौक या ठिकाणच्या एसबीआय बँकेच्या दोन एटीएम मशीन्स चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने फोडल्या. मशीन्स मधील १६ लाखाची रक्कम घेऊन चोरटे जीपमधून फरार झाले. घटनेची माहिती कळताच नांडेड पोलीसांनी तातडीने नाकाबंदी केली. तसेच अन्य जिल्ह्यातील पोलीसांना देखील या घटनेची माहिती देण्यात आली.
बुलढाण्यात नाकाबंदीत सापडले
नांदेड पोलिसांच्या माहितीवरून बुलढाणा पोलिसांनी नाकाबंदी केली. यात लुटलेली रक्कम घेऊन पसार झालेले चोरटे पोलिसांच्या जाळ्यात सापडले. यावेळी अटक केलेल्या आरोपींकडे तब्बल ५६ लाख रुपये आढळले.
नागपूरमध्ये ३ एटीएम फोडली
चोरट्यांना पोलिसांनी बोलत केला असता त्यांनी नागपूर येथे २४ आणि २५ जूनला तीन एटीएम फोडल्याची माहिती दिली. येथेही त्यांनी गॅस कटरच्या सह्याने मशीन्स फोडल्या होत्या. एका जिल्ह्यात चोरी केल्यानंतर ते आपल्या गाडीची नंबर प्लेट बदलत असत अशी माहितीही यावेळी मिळाली. दरम्यान, या आरोपींना ताब्यात घेण्यासाठी नांदेड पोलिसांचे एक पथक बुलढाणा येथे रवाना झाले आहे.