Nanded Attack on Police: तलवार, भाल्याने पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी ३०० जणांवर गुन्हा दाखल; १८ अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 03:11 PM2021-03-30T15:11:17+5:302021-03-30T15:22:23+5:30
Nanded Attack on Police: या प्रकरणात ३०० जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून ६० जणांची सीसीटिव्ही फुटेजवरुन ओळख पटविण्यात आहे.
नांदेड : येथील श्री सचखंड गुरुद्वाराच्या वतीने दरवर्षी धुळवडीच्या दिवशी पारंपारिक पद्धतीने हातात उघडी शस्त्रे प्रतिकात्मक हल्ला बोल मिरवणुक काढण्यात येते. परंतु यंदा लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मिरवणुकीसाठी परवानगी नाकारली होती. सोमवारी सायंकाळी चार वाजता गुरुद्वारात आरती झाल्यानंतर मात्र तरुण भाविकांचे जत्थे हातात उघड्या तलवारी घेवून मिरवणुक गुरुद्वाराच्या बाहेर घेवून आले. यावेळी पोलिसांनी अटकाव करताच त्यांच्यावर भाला आणि तलवारीने हल्ला करण्यात आला. यामध्ये आठ पोलिस कर्मचारी जखमी झाले असून पोलिसांच्या आठ वाहनांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणात ३०० जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून ६० जणांची सीसीटिव्ही फुटेजवरुन ओळख पटविण्यात आहे. तर १८ जणांना अटक केली आहे. इतर आरोपींचा शोध सुरु असल्याची माहिती पाेलिस अधीक्षक प्रमोद कुमार शेवाळे यांनी दिली.
याबाबत मंगळवारी पाेलिस अधीक्षक प्रमोद कुमार शेवाळे पत्रपरिषदेत म्हणाले, लॉकडाऊन असल्यामुळे यंदा मिरवणुकीला परवानगी नाकारली होती. मिरवणुक काढू नये म्हणून जिल्हाधिकारी विपीन ईटणकर आणि मी गुरुद्वाराची प्रशासकीय समिती व संत बाबा कुलवंतसिंगजी, संत बाबा बलविंदरसिंगजी यांच्याशी चर्चा केली हाेती. सर्वांनी त्यावेळी मिरवणुक काढणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच समाजाला आवाहनही केले होते. परंतु २९ मार्च धुळवडीच्या दिवशी सायंकाळी चार वाजता अरदास झाल्यानंतर गुरुद्वाराच्या आत हल्ला बोल मिरवणुक काढण्यात आली. यावेळी काही उत्साही तरुणांनी ही मिरवणुक गुरुद्वाराच्या बाहेर नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी धर्मगुरुंनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु कोणीच ऐकून घेण्याच्या तयारीत नव्हते.
तरुणांच्या या जत्थ्याने एक क्रमांकाच्या प्रवेशद्वारासमोरील बॅरीकेटींग तोडून मुख्य रस्त्यावर धाव घेतली. यावेळी बंदोबस्तावरील पोलिसांवर तलवार आणि भाल्याने हल्ला चढविला. यामध्ये पोलिस उपाधीक्षकासह इतर सात कर्मचारी जखमी झाले असून त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. तर पोलिस अधीक्षक, उपधीक्षक, पोलिस निरिक्षक यासह इतर आठ वाहनांचे प्रचंड नुकसान करण्यात आले आहे. या प्रकरणात ३०० जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून ६० जणांची सीसीटिव्ही फुटेजवरुन ओळख पटविण्यात आहे. तर १८ जणांना अटक केली आहे. इतर आरोपींचा शोध सुरु असल्याचेही शेवाळे म्हणाले.
पोलिसांना होती पूर्वसुचना
मागील वर्षी लॉकडाऊन असताना न्यायालयाच्या परवानगीने दसऱ्यानिमित्त गुरुद्वारातून मिरवणुक काढण्यात आली होती. परंतु त्यावेळी मोठा गोंधळ उडाला होता. मिरवणुकीत मास्क वापरण्यात आले नव्हते. तसेच सोशल डिस्टसिंगचा फज्जा उडाला होता. तसेच पोलिसांसोबत धक्काबुक्कीचा प्रकारही घडला होता. यावेळीही तसाच काहीसा प्रकार होणार याची पूर्वसुचना होती. अशी कबुली पोलिस अधीक्षक शेवाळे यांनी दिली.
आरोपींची गय केली जाणार नाही
गुरुद्वारा येथील धर्मगुरुंनी मिरवणुक निघणार नाही अशी प्रशासनाला ग्वाही दिली होती. परंतु काही जणांनी तो शब्द पाळला नाही. त्यामुळे या घटनेला केवळ प्रशासनाला जबाबदार धरुन चालणार नाही. घटनेतील आरोपींची गय केली जाणार नाही अशी प्रतिक्रिया पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी दिली.
पोलिसांना नीट काम करु दिले जात नाही
नांदेडमध्ये पोलिसांना नीट काम करु दिले जात नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या विकृती फोफावल्या आहेत. अशी टिका खा.प्रताप पाटील चिखलीकर यांनी केली. तसेच धुळवडीच्या दिवशीच गुरुद्वाराचे सचिव मुंबईला कसे गेले होते असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.