कोविशिल्ड ट्रेडमार्कवर नांदेडच्या कंपनीचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:31 AM2020-12-14T04:31:55+5:302020-12-14T04:31:55+5:30
याबाबत क्युटीस बायोटेकच्या अर्चना आशिष काबरा यांच्या वतीने ॲड. मिलिंद एकताटे, ॲड. आनंद बंग आणि ॲड. आदित्य राजशेखर यांनी ...
याबाबत क्युटीस बायोटेकच्या अर्चना आशिष काबरा यांच्या वतीने ॲड. मिलिंद एकताटे, ॲड. आनंद बंग आणि ॲड. आदित्य राजशेखर यांनी हा दावा दाखल केला आहे. त्याबाबत ॲड. एकताटे म्हणाले, क्युटीस बायोटेक कंपनीने २० एप्रिल २०२० रोजी कोविशिल्ड या नावाने वर्ग ५ मध्ये ट्रेडमार्ककडे अर्ज करून नोंदणी केली आहे; परंतु प्रतिवादी सीरम इन्स्टिट्यूट आणि फार्मास्युटिकल कंपनीचे भंडारू श्रीनिवास यांनी कोविशिल्ड हे नाव वापरले. अशा प्रकारे आमची या नावाची ट्रेडमार्ककडे अगोदर नोंदणी असताना वापरलेल्या नावावर आक्षेप होता. त्यामुळे क्युटीसचे कर्नाटक, महाराष्ट्र, हरयाणा या राज्यातील सॅनिटायझरच्या मागणीवर परिणाम होऊन नुकसान होणे स्वाभाविक होते. त्यामुळे हा ट्रेडमार्क आमचा असल्याबाबत आम्ही न्यायालयात दावा दाखल केला आहे. याबाबत आता १८ डिसेंबरला सुनावणी होणार असल्याचेही ॲड. एकताटे म्हणाले. त्यामुळे आता १८ डिसेंबरच्या सुनावणीत नेमके काय होते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
दरम्यान, क्युटीसचे आशिष काबरा म्हणाले, कोविशिल्ड नावाने फक्त सॅनिटायझर नाही, तर अन्यही उत्पादने आहेत. त्यात ॲटिसेप्टिक लिक्वीड, फ्रुट अँड व्हेजिटेबल वॉश ही तीन उत्पादने सध्या बाजारात आहेत. तर येत्या काळात कोविशिल्ड नावाने सीरप, टॅबलेट यासह इतर २० उत्पादने सुरू करण्यात येणार आहेत. कोविशिल्ड इंजेक्शनचे ऑगस्टमध्येच उत्पादन करण्यात येणार होते; परंतु संबंधित उत्पादकाने कोविशिल्ड हे नाव सीरम वापरत असल्याचे सांगून उत्पादन करून देण्यास नकार दिला. सध्या क्युटीसची उत्पादने कर्नाटक, छत्तीसगड, तेलंगणा, गुजरात आणि महाराष्ट्रमध्ये विकली जातात.