नांदेड भाजपात पडली उभी फूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 12:58 AM2018-04-23T00:58:15+5:302018-04-23T00:58:35+5:30

महापालिकेतील विरोधी पक्षनेता पदावरुन गुरप्रीतकौर सोडी यांना इतर पाच नगरसेवकांनी एकटे पाडले आहे. सोडी वगळता इतर पाच नगरसेवकांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना तसेच महानगराध्यक्ष डॉ. संतुक हंबर्डे एक पत्र देत पाचपैकी एकाची विरोधी पक्षनेता म्हणून निवड करण्याची मागणी केली आहे.

Nanded BJP fell apart | नांदेड भाजपात पडली उभी फूट

नांदेड भाजपात पडली उभी फूट

Next
ठळक मुद्देविरोधी पक्षनेते पदाचे त्रांगडे : सोडी वगळता इतर कोणालाही पद देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : महापालिकेतील विरोधी पक्षनेता पदावरुन गुरप्रीतकौर सोडी यांना इतर पाच नगरसेवकांनी एकटे पाडले आहे. सोडी वगळता इतर पाच नगरसेवकांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना तसेच महानगराध्यक्ष डॉ. संतुक हंबर्डे एक पत्र देत पाचपैकी एकाची विरोधी पक्षनेता म्हणून निवड करण्याची मागणी केली आहे.
महापालिकेच्या २०१७ मध्ये झालेल्या काँग्रेसच्या त्सुनामी लाटेत बोटावर मोजण्याइतपत निवडून आलेल्या भाजपाच्या सहा नगरसेवकांमध्येही उभी फूट पडली आहे. भाजपाचे केवळ सहा नगरसेवक निवडून आले आहेत. महापालिकेत काँग्रेसनंतर भाजपा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. प्रारंभी पक्षाचे महानगराध्यक्ष डॉ. हंबर्डे यांनी गुरप्रितकौर सोडी यांना विरोधी पक्षनेते पद द्यावे, अशी शिफारस केली होती. मात्र महापौर शीलाताई भवरे यांनी अद्यापही या पदास मान्यता दिली नाही. जवळपास पाच महिन्यांपासून हा विषय भिजत घोंगडेच राहिला आहे. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी निर्णय घेण्याचे आदेश दिले असतानाही त्यावर अद्यापही निर्णय झाला नाही. त्यातच महापालिका प्रशासनानेही विरोधी पक्षनेता कक्षाला सील ठोकले आहे. त्यामुळे भाजपाची महापालिकेत पूर्णत: कोंडी करण्यात काँग्रेसला यश आले. निवडणुकीत सपाटून मार खालेल्या भाजपाच्या निवडून आलेल्या नगरसेवकांनाही महापालिकेत कोणतेही स्थान राहू नये, याची पूर्ण तजवीज महापालिकेत सत्ताधाºयांनी केली आहे.
या सर्व प्रकरणामुळे भाजपात असंतोष निर्माण झाला. त्यातून गुरप्रितकौर सोडी यांना वगळता इतर पाचपैकी कोणालाही विरोधी पक्षनेता करावे, असे पत्रच भाजपाच्या पाच नगरसेवकांनी दिले आहे. पक्षाने या प्रकरणात अद्यापही कोणताही निर्णय घेतला नसला तरीही महापालिकेत इनमीन निवडून आलेल्या सहा सदस्यांनाही एकत्र ठेवण्यात भाजपाला अपयश आल्याचे स्पष्ट होत आहे. विरोधी पक्षनेता पद मिळविण्यासाठी संघर्ष करणाºया गुरप्रीतकौर सोडी यांना महापालिकेत काँग्रेससह आता भाजपाच्या पाच नगरसेवकांचाही सामना करावा लागणार आहे.
एकूणच विरोधी पक्षनेता प्रकरणात भाजपाच्या वरिष्ठांनी वेळीच लक्ष न दिल्यामुळे पक्षात फूट निर्माण झाली आहे. त्यामुळे महापालिकेतील सहा नगरसेवकांतील अंतर्गत संघर्ष आता पक्ष कोणत्या पद्धतीने सोडवेल याकडे लक्ष लागले आहे.

भाजपांतर्गत वाद सोशल मीडियावरही
विरोधी पक्षनेते संदर्भात भाजपामध्ये सुरु असलेला अंतर्गत वाद आता सोशल मीडियावरही आला आहे. ज्यांनी विधान परिषद निवडणुकीत आ. प्रताप पाटील चिखलीकर यांना दगाफटका केला तेच आज त्यांच्याशी एकनिष्ठ असल्याच्या गप्पा करत आहेत. विधान परिषद निवडणुकीदरम्यान कोण कुठे होते? हे आता गुपित राहिले नाही. विरोधी पक्षात राहूनही सत्ताधाºयांना मतदान करणारे आज चिखलीकरांच्या शब्दाबाहेर जाणार नसल्याचे सांगत आहेत. मनपातील माजी विरोधी पक्षनेते आज काँग्रेसच्या ओंजळीने पाणी पिवून विरोधी पक्षनेते पद मिळविण्याचा प्रयत्न करत असल्याची टीकाही केली आहे. सोशल मीडियावर विरोधी पक्षनेते पद प्रकरणात होत असलेल्या चर्चेची पक्ष दखल घेईल काय? हे पाहणे उत्सुुकतेचे आहे.

नगरसेवकांचे कोणतेही पत्र मिळाले नाही
या प्रकरणात भाजपाचे महानगराध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे यांच्याशी संपर्क साधला असता असे कोणतेही पत्र आतापर्यंत तरी आपल्याला प्राप्त झाले नाही. आपण सध्या बाहेरगावी असून नांदेडमध्ये आल्यानंतर याबाबत अधिक माहिती देता येईल, असे हंबर्डे म्हणाले.

Web Title: Nanded BJP fell apart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.