नांदेडच्या कुणाल व कपिलची राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावर मोहोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 05:30 PM2019-08-12T17:30:03+5:302019-08-12T17:33:26+5:30

भोंगा, पाणी चित्रपटात दोघांच्या दमदार भूमिका 

Nanded bourn Kunal and Kapil's mark on National Film Awards | नांदेडच्या कुणाल व कपिलची राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावर मोहोर

नांदेडच्या कुणाल व कपिलची राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावर मोहोर

googlenewsNext
ठळक मुद्देकपिल कांबळे व कुणाल गजभारे यांच्या चित्रपटात मुख्य भूमिकाराष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावर नांदेडची मोहोर

- भारत दाढेल 

नांदेड : यंदाच्या राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात नांदेडच्या कुणाल गजभारे व कपिल कांबळे या दोन अभिनेत्यांनी आपली मोहोर उमटवली़ चित्रपटसृष्टीतील पदार्पणातच राष्ट्रीय पुरस्कार मिळविणाऱ्या या दोन कलावंतांची नाळ येथील मातीशी जोडल्या गेली असल्याने सिनेसृष्टीत नांदेडचा दबदबा निर्माण झाला आहे़

६६ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून घोषित झालेला ‘भोंगा’ व पर्यावरण संवर्धनावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेला ‘पाणी’  या  दोन्ही चित्रपटात कपिल कांबळे व कुणाल गजभारे यांनी भूमिका साकारली आहे़ त्यांच्या अभिनयाची दखल  राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे़ न्यूयार्क  व गोवा येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात  समीक्षकांनी भोंगा व पाणी या चित्रपटांचे कौतुक केले आहे़ हा यशस्वी प्रवास दोन्ही कलावंतांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला़ नांदेड येथील लोकमित्रनगर येथे राहणारा कपिल अशोकराव कांबळे हा युवा कलावंत भोंगा मध्ये मुख्य भूमिका साकारत आहे़ यापूर्वी त्याने पाटील चित्रपटात साकारलेला खलनायक गाजल्यानंतर भोंगा या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे़ देगलूर येथील शालेय व महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर स्वारातीम विद्यापीठात एम़ ए़ नाट्य शास्त्राची पदव्युत्तर पदवी हातात घेऊन कपिल थेट मुंबईला निघाला़ रंगभूमीवर काही नाटकातून काम  केलेल्या कपीलचे अनोळखी असलेल्या चित्रपटसृष्टीत  सुरूवातीचे पाच, सहा वर्षे अत्यंत खडतर गेले़ सुरुवातीला टीव्हीवरील लक्ष्य, क्राईम पेट्रोल या मालिकेत काम करून पोटाची सोय करता आली़ एक दिवस धग चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माता शिवाजी लोटन पाटील यांचा फोन आला आणि भोंग्या या चित्रपटात तू मुख्य भूमिका करत असल्याचे त्यांनी सांगितले़ 

‘पाणी’ चित्रपटात खलनायक
श्रीनगर येथील कुणाल विठ्ठलराव गजभारे या युवा कलावंताने आदिनाथ कोठारे दिग्दर्शित ‘पाणी’ या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली आहे़ तसेच या चित्रपटाचे संवाद लेखन व कास्टिंगची महत्त्वाची भूमिकाही पार पाडली आहे़ प्रियंका चोप्रानिर्मित पाणी या चित्रपटात काम  करणारे आदिनाथ कोठारे, सुमेध भावे, किशोर कदम आदी कलावंतांना नांदेड जिल्ह्यातील भाषा शिकविण्याचे कामही कुणालने केले आहे़  च् ‘पाणी’ हा चित्रपट मुळात नांदेडच्या मातीत निर्माण झालेला चित्रपट आहे़ जिल्ह्यातील नागदरवाडीतील हनुमंत केंद्रे यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे़ त्याचे संपूर्ण चित्रिकरण कंधार- लोहा तालुक्यात झाले आहे़ 

या चित्रपटाचे दिग्दर्शन  नांदेडचे भूमिपुत्र दिग्दर्शक कुणाल गजभारे यांनी केले आहे़ हा अनुभव सांगताना कुणाल म्हणाला, मुंबई विद्यापीठात एम़ ए़ नाट्यशास्त्राची पदवी घेतल्यानंतर हळूहळू सिनेसृष्टीत अभिनय, दिग्दर्शन, लेखन आदी कामे करण्याची संधी मिळू लागली़ बाबा आमटे या चित्रपटाचे कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम केले. ‘पाणी’ चित्रपटासाठी नितीन दीक्षित यांचा फोन आल्यानंतर मी आदिनाथ कोठारे यांना भेटलो़ त्यांनी मला या चित्रपटाच्या कथेतील संवाद नांदेड जिल्ह्यातील भाषेत लिहिण्यास सांगितले़ कारण हा चित्रपटच कंधार, लोहा परिसरात तयार होणार होता़ 
मी माझ्या भाषेत लिहिलेले संवाद त्यांना आवडले़ आणि मग या चित्रपटाच्या विविध जबाबदाऱ्याही माझ्यावर त्यांनी टाकल्या़ या चित्रपटातील भाषा ही नांदेडच्या मातीतील आहे़ या चित्रपटात नांदेडमधील कलावंत दिनेश कवडे, रवी जाधव, किरण कवडे, गणेश जयस्वाल, अनुराधा पत्की यशवंत कागणे, माधुरी लोकरे, विजय गजभारे, महेश घुंगरे, बळी डिकळे, मयूर दवणे, प्रमोद देशमुख आदी कलावंतांनी यात भूमिका साकारल्या आहेत़

Web Title: Nanded bourn Kunal and Kapil's mark on National Film Awards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.