नांदेडमध्ये १०० कुटुंबांच्या श्रमदानातून कोटीचे विहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 01:01 AM2018-04-30T01:01:07+5:302018-04-30T01:01:07+5:30

 Nanded carries 100 crores of tribal welfare | नांदेडमध्ये १०० कुटुंबांच्या श्रमदानातून कोटीचे विहार

नांदेडमध्ये १०० कुटुंबांच्या श्रमदानातून कोटीचे विहार

googlenewsNext
ठळक मुद्देनवीवाडीतील उपक्रम : २६ वर्षांच्या संघर्षानंतर मिळाले मूर्त रूप

विशाल सोनटक्के।
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : विहार म्हणजे समाजाला जोडणारा दुवा. आदर्श आणि जागरुक पिढी घडविण्यासाठी आपल्या वाडीतच सर्व सुविधांयुक्त विहार उभे करण्याचा संकल्प तब्बल २६ वर्षानंतर प्रत्यक्षात आला आहे. सुमारे एक कोटीचे हे विहार पूर्णा रोडवरील नवीवाडीतील शंभर कुटुंबांच्या श्रमदान आणि लोकवाट्यातून साकारले आहे.
१९५४ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रह्मदेशच्या बुद्धिस्ट शासन कौन्सिलपुढे बोलताना आपल्या अनुयायांना विहाराचे महत्त्व पटवून दिले होते. विहार उभारा, नियमितपणे तेथे जावून वंदना घ्या आणि उपदेश ग्रहण करतानाच समाजाचेही प्रबोधन करा, असा संदेश त्यांनी दिला होता. त्यानंतर केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरात बौद्ध विहार उभारणीची चळवळ सुरू झाली. नांदेडमध्येही विविध ठिकाणी विहारे उभारली आहेत. ही विहारे पाहिल्यानंतर नवीवाडी पूर्णारोड येथील वाडी बु. मधील तरुणांना आपल्या परिसरातही विहार उभारण्याची संकल्पना सुचली. वाडी बु. मध्ये बौद्ध समाजाची सुमारे शंभर घरे आहेत. यातील ९० टक्के कुटुंबांची रोजीरोटी मजुरीवर अवलंबून आहे. मग विहार उभारायचे कशाने? असा प्रश्न या तरुणांसमोर उभा राहिला.
त्यावेळी रमेश बुक्तरे यांच्यासह गोमाजी, विठ्ठल, रमेश, धर्माजी, निवृत्ती, किसन, वामनराव, संजय, सुदर्शन, दत्ता, साहेबराव आदी बुक्तरे कुटुंबातील सदस्यांसह हिरामण गोवंदे, आनंदा कंधारे आदींनी वाडीतीलच समाजातून लोकवर्गणी उभी करुन विहार बांधण्याचा निर्णय घेतला. बांधकामासाठी श्रमदान करण्याचा संकल्प या पुरुषांसह कुटुंबातील महिला आणि चिमुकल्यांनीही केला. आणि त्यानंतर १९९२ मध्ये विहाराच्या प्रत्यक्ष कामास सुरूवात झाली. १९९४ पासून प्रत्येक कुटुंबाकडून महिन्याला ५० रुपये लोकवर्गणी जमा करण्यात येवू लागली. याबरोबरच नवीवाडीतील २५ ते ३० तरुणांचे भीमसेना लेझीम पथकही होते. या पथकाला त्या काळी मोठ-मोठ्या कार्यक्रमांसाठी मागणी असायची. या कार्यक्रमातून मिळालेले मानधनही या तरुणांनी विहार उभारणीसाठी दिले. यातून काही रक्कम उभारल्यानंतर हा पैसा गरजू कुटुंबाला अडी-नडीच्या वेळी देण्यात येवू लागला. गरज संपल्यानंतर घेतलेल्या पैशात काही भर घालून तो पैसा पुन्हा विहाराच्या बांधकाम कमिटीकडे येवू लागला. विहाराच्या फाऊंडेशनसह इतर कामासाठीही वस्तीतील सर्व कुटुंबियांनी मोठ्या उत्साहाने श्रमदान केले. त्यामुळेच आज हे भव्य विहार उभे राहिले आहे. सद्य:स्थितीत या दोन मजली विहारातील खालच्या मजल्यावर एका सभागृहासह पुस्तकांसाठी एक खोली बांधण्यात आली असून दुसऱ्या मजल्यावर बुद्धवंदनेसाठी मोठे सभागृह उभारण्यात आले आहे. विहारासाठी उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथून पाच फुटांची तथागताची देखणी मूर्ती आणण्यात आली असून मंगळवारी सकाळी १० वाजता या विहाराचे लोकार्पण होणार आहे. २६ वर्षांच्या कष्ट आणि संघर्षानंतर साकारलेली विहाराची देखणी इमारत पाहिल्यानंतर या सर्वांचेच चेहरे आनंदाने फुलून गेल्याचे चित्र होते.

Web Title:  Nanded carries 100 crores of tribal welfare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.