नांदेड शहराला आता दिवसाआड पाणी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2018 12:48 AM2018-07-08T00:48:42+5:302018-07-08T00:49:10+5:30
विष्णूपुरी प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ झाल्यामुळे नांदेड शहराला सोमवारपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन आयुक्त लहुराज माळी यांनी केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : विष्णूपुरी प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ झाल्यामुळे नांदेड शहराला सोमवारपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन आयुक्त लहुराज माळी यांनी केले आहे.
नांदेड शहराला विष्णूपुरी प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ झाली आहे. आजघडीला विष्णूपुरी प्रकल्पात ४० टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. हा साठा पुरेसा असल्याने शहराला २ ऐवजी एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात येत असल्याचे आयुक्त माळी यांनी सांगितले.
शहराला मागील दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात होता. रमजान ईदपूर्वी दररोज पाणीपुरवठा करण्याची मागणी महापालिका पदाधिकाऱ्यांनी केली होती. मात्र तांत्रिक बाबीमुळे दररोज पाणीपुरवठा करणे अथवा एक दिवसाआड पाणीपुरवठा करणे शक्य नव्हते. पाणीपुरवठा विभागाने तांत्रिक अडचणी दूर करताना एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारपासून शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. यासाठी पाणीपुरवठा कर्मचाºयांच्या संख्येत अल्पशी वाढ करण्यात आली आहे. पाणीपुरवठा विभागाने ८ वॉलमेन वाढवले आहेत तर पंप आॅपरेटरलाही गरजेनुसार हलवण्यात आले असल्याचे कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे यांनी सांगितले.
---
पाणी गळतीला घातला आळा
शहराला एक दिवसआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. हा निर्णय घेताना महापालिकेने जवळपास एक महिना तयारी केली आहे. शहरातील कोटीतीर्थ पंपहाऊस येथे चार ठिकाणाहून होणारी पाणीगळती थांबविली आहे तर काळेश्वर पंपहाऊसवरुन एका ठिकाणी आणि काबरानगर पंपहाऊसवरील एका ठिकाणची गळती थांबवण्यात आली आहे. या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात पाणी गळती सुरू होती. कोटीतीर्थ पंपहाऊसवर मनपाने अतिरिक्त पंपही उपलब्ध करुन दिला आहे. महावितरणची साथ मिळाल्यास दिवसाआड पाणी मिळणार आहे.