नांदेडमध्ये स्वच्छता कामगारांच्या आरोग्याशी खेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 12:19 AM2018-08-13T00:19:10+5:302018-08-13T00:19:54+5:30
शहराचा पसारा दिवसेंदिवस वाढत असून शहर स्वच्छतेच्या नावाखाली शासनाच्या विविध योजनांतून कोट्यवधी रुपयांचा चुराडा करण्यात येत आहे़ परंतु स्वच्छतेची मुख्य जबाबदारी असलेल्या कामगारांची मात्र हेळसांड करण्यात येत आहे़ घाणीत उतरुन काम करणाऱ्या या कामगारांना हॅन्डग्लोव्हज, गमबूट, मास्क यासारख्या साहित्यांचाही अद्याप पुरवठा करण्यात आला नाही़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : शहराचा पसारा दिवसेंदिवस वाढत असून शहर स्वच्छतेच्या नावाखाली शासनाच्या विविध योजनांतून कोट्यवधी रुपयांचा चुराडा करण्यात येत आहे़ परंतु स्वच्छतेची मुख्य जबाबदारी असलेल्या कामगारांची मात्र हेळसांड करण्यात येत आहे़ घाणीत उतरुन काम करणाऱ्या या कामगारांना हॅन्डग्लोव्हज, गमबूट, मास्क यासारख्या साहित्यांचाही अद्याप पुरवठा करण्यात आला नाही़ त्यामुळे या कर्मचा-यांच्या आरोग्याशी महापालिकेने खेळ चालविला आहे़ विशेष म्हणजे काही महिन्यापूर्वीच नांदेडात आलेल्या स्वच्छता आयोगाने यावर कडक शब्दात नाराजी व्यक्त केली होती़
शहराची लोकसंख्या साडे पाच लाखांच्या घरात आहे़ शहराचा विस्तारही चोहोबाजूंनी वाढतच आहे़ त्यामुळे इतर जिल्ह्यांसारखी नांदेडात स्वच्छतेची समस्या निर्माण होवू नये यासाठी स्वच्छता कामगारांची पुरेसी संख्या असणे आवश्यक आहे़ कामगारांच्या संख्येबरोबरच त्यांना सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या सुविधा देण्याचीही गरज आहे़ परंतु चेंबर साफ करणाºया, कचरा उचलणा-या कर्मचा-यांकडे आतापर्यंत दुर्लक्षच करण्यात आले आहे़ या कामगारांमध्ये महापालिकेचे काही कामगार असून कंत्राटदारानेही काही कामगारांची नियुक्ती केली आहे़ कंत्राटदाराकडून या कामगारांना दिवसाकाठी केवळ ३०० रुपये दिले जातात़ ते ही वेळेवर मिळतील याची शाश्वती कमीच असते़ महिन्याच्या १ तारखेला मिळणाºया मजूरीसाठी त्यांना अनेकवेळा अर्धा महिना लोटण्याची वाट पाहावी लागते़ घाणीत उतरुन हातानेच त्यांना ही कामे करावी लागत असल्यामुळे त्यांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो़ मागील वर्षी देगलूर नाका भागात ड्रेनेजच्या चेंबरमध्ये उतरलेल्या दोन मजूरांचा श्वास गुदमरल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली होती़ त्यानंतर अशाचप्रकारे एक घटना घडली होती़
परंतु कामगारांच्या दुर्देवी मृत्यूनंतरही मनपाला जाग आली नाही़ महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख असताना स्वच्छता आयोगाचे सदस्य नांदेडात आले होते़ त्यांनी या स्वच्छता कामगारांची अवस्था पाहून तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती़ त्यावेळी महापालिका प्रशासनाने कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने लवकरच त्यांना साहित्य पुरवठा करण्याचे आश्वासन दिले होते़ परंतु या आश्वासनाचाही महापालिकेला विसर पडल्याचे दिसत आहे़ तर उन्हाळे यांच्या कार्यकाळात रात्रीच्या वेळी स्वच्छतेची कामे करण्यात येत होती़ त्यावेळी महिला कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता़ परंतु त्यावर महानगरात रात्रीच स्वच्छता होत असल्याचे कारण देवू या विषयाला बगल देण्यात आली होती़
---
साहित्य आले, वाटपच नाही
कामगारांसाठी गणवेष, हॅन्डग्लोव्हज आणि गमबूट असे साहित्य स्वच्छतेचे कंत्राट असलेल्या कंपनीने खरेदी केल्याची माहिती आहे़ परंतु या साहित्याचे अद्याप कामगारांना वाटपच करण्यात आले नाही़ त्यामुळे कर्मचाºयांजवळील तुटपुंज्या साहित्यावरच त्यांना स्वच्छतेची कामे करावी लागतात़