Nanded Crime: नांदेडमध्ये पुन्हा गोळीबार, पोलिसावर तलवारीने हल्ला; आरोपीवर पोलिसांनी झाडली गोळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 21:03 IST2022-04-08T21:03:24+5:302022-04-08T21:03:48+5:30
मंगळवारी नांदेडात बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.

Nanded Crime: नांदेडमध्ये पुन्हा गोळीबार, पोलिसावर तलवारीने हल्ला; आरोपीवर पोलिसांनी झाडली गोळी
नांदेड- नांदेड शहर पुन्हा गोळीबाराने हदरले आहे. व्यावसायिक संजय बियाणी यांची गोळ्या घालून हत्या करण्याची घटना ताजी असताना शुक्रवारी रात्री साडे सात वाजेच्या सुमारास नांदेड ग्रामीण हद्दीत आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पाेलिसांच्या पथकावर आरोपीने तलवारीने हल्ला केला. त्यामुळे बचावासाठी पोलिसांनी आरोपीच्या मांडीवर गोळी झाडली. उपचारासाठी त्या आरोपीला रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
या घटनेमुळे पुन्हा एकदा नांदेड हादरले आहे. मंगळवारी नांदेडात बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी घटनेनंतर नाकाबंदी करण्यास सुरुवात केली आहे. तसेच ज्यांच्यावर देशी कट्टयांचे गुन्हे आहेत, त्यांची झाडाझडती सुरु आहे. त्यातच नांदेड ग्रामीणचे पोनि.अशोक घोरबांड हे पथकासह वसरणी भागात पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी गुन्हेगार संजूसिंह बावरी हा साईबाबा मंदिर परिसरात असल्याची माहिती मिळाली.
त्यानंतर पथक त्याच्याकडे गेले असता, त्याने माझ्याकडे कशाला आले असे म्हणून शिवा पाटील या कर्मचाऱ्यांवर तलवारीने हल्ला केला. यात पाटील हे जखमी झाले. इतरही कर्मचाऱ्यांच्या अंगावर तो तलवार घेवून धावत होता. यावेळी पोनि.घोरबांड यांनी त्यांच्या मांडीवर गोळी घालून त्याच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर आरोपी बावरी आणि कर्मचारी पाटील या दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बनावट पिस्टल घेवून स्टेटस पडले महागात
शहरात अनेक तरुणांनी हातात देशी कट्टे, खंजर घेवून आम्ही याच भागातील डॉन आहोत, अशा प्रकारचे स्टेटस सोशल मिडीयावर ठेवले आहेत. सायबर सेलकडून त्यांच्या लक्ष ठेवण्यात येत आहे. भाग्यनगर हद्दीत पूयणी येथील चांदू पावडे यानेही बनावट पिस्टल हातात घेवून सोशल मिडीयावर स्टेटस ठेवले होते. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अशी माहिती पोनि.सुधाकर आडे यांनी दिली.