रेल्वेच्या नांदेड विभागाने विनातिकीट प्रवाशांकडून केला २ लाखाचा दंड वसूल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2017 06:15 PM2017-12-26T18:15:34+5:302017-12-26T18:17:07+5:30
विनातिकीट प्रवासाला आळा घालण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभागाच्या वतीने धडक तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत ६२३ विनातिकीट प्रवाशांकडून दोन लाखांहून अधिक दंड वसूल करण्यात आला.
नांदेड : विनातिकीट प्रवासाला आळा घालण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभागाच्या वतीने धडक तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत ६२३ विनातिकीट प्रवाशांकडून दोन लाखांहून अधिक दंड वसूल करण्यात आला. तसेच रेल्वेतील इतर सुविधांचीही अधिकार्यांच्या पथकाने तपासणी केली.
वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक नेहा रत्नाकर, सहायक वाणिज्य व्यवस्थापक रवी वर्मा यांच्यासह तीनही वाणिज्य विभागाच्या अधिकार्यांनी या मोहिमेत भाग घेतला. नांदेड, औरंगाबाद, मुदखेड भागात धावणार्या रेल्वे गाड्यांची अचानक तपासणी केली. त्यात ५ एक्स्प्रेस आणि ६ पॅसेंजर गाड्या तपासण्यात आल्या. त्यामुळे विनातिकीट प्रवाशांचे धाबे दणाणले. तपासणीत तब्बल ६२३ विनातिकीट प्रवासी सापडले. तसेच अनियमित प्रवास करणे आणि परवानगी शिवाय जास्त सामान घेवून जाणार्या काही प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. या विनातिकीट प्रवाशांकडून एका दिवसांतच दोन लाख सहा हजार रुपये एवढा दंड वसूल करण्यात आला.
नांदेड विभागात एका दिवसात एवढा जास्त दंड वसूल करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या कारवाईत रेल्वे सुरक्षा अधिकारी, २५ तिकीट तपासणीस, १० रेल्वे पोलीस फोर्सचे जवान सहभागी झाले होते. तपासणी दरम्यान बरेच प्रवासी सिझन तिकीट घेवून आरक्षित डब्यांत बसल्याचे तर काही दूधवाले जनरल तिकीट घेवून प्रवास करीत असल्याचे निदर्शनास आले. या सर्वांना समज देण्यात आली. दरम्यान, या पथकाने स्वछता, खाद्यपदार्थ, पाणी, त्यांच्या किमती, पाण्याची उपलब्धता, पंखे, वीज आदी बाबींचीही यावेळी तपासणी केली. या माहिमेमुळे कोणतीही रेल्वे उशिरा धावणार नाही याची पूर्ण खबरदारी घेण्यात आली आहे, असेही रेल्वेच्या अधिकार्यांनी सांगितले.
मेन्यू, रेटकार्ड नसणार्या विक्रेत्यांनाही दंड
रेल्वे डब्यात विनापरवाना खाद्यपदार्थ विक्री करणार्या चार विक्रेत्याविरुद्धही यावेळी काावाई करीत पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. तर ६ अनधिकृत विक्रेत्यांना पकडून त्यांच्याकडून सहा हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच सचखंड एक्स्प्रेसमध्ये काही अधिकृत विक्रेते मेन्यू कार्ड, रेट लिस्ट सोबत ठेवत नव्हते, त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली. तसेच काही पॉकेटवर किंमत नव्हती. अधिकृत विक्रेत्यांनी मेन्यू कार्ड, रेट लिस्ट सोबत ठेवणे, पॉकेटवर किंमत लिहिणे बंधनकारक असून ओळखपत्रही सोबत ठेवणे बंधनकारक आहे, असे सांगून त्यांच्याकडून पाच हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.