नांदेड जिल्ह्यातील प्रकल्पांत ५७ टक्के पाणीसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 07:29 PM2019-09-21T19:29:53+5:302019-09-21T19:31:17+5:30
गतवर्षीच्या तुलनेत यंदा प्रकल्पात २१ दलघमी साठा अधिक
नांदेड : उशिरा का होईना जिल्ह्यातील मोठे, मध्यम, लघू व उच्च पातळी बंधाºयांत पाणीसाठा उपलब्ध झाला असून गतवर्षीच्या तुलनेत यंदा २१ दलघमी साठा अधिक झाला आहे़ सर्व प्रकल्पांत ५७ टक्के उपयुक्त साठा असल्याची नोंद झाली असून विष्णूपुरी व मानार हे प्रकल्प तुडुंब भरले आहेत़ त्यामुळे दुष्काळाने होरपळलेल्या अनेक गावांना या पाण्यामुळे दिलासा मिळाला आहे़
यंदा जून, जुलै व आॅगस्टमध्ये समाधानकारक पाऊस न पडल्यामुळे जिल्ह्यातील सर्व प्रकल्प कोरडेच होते़ विष्णूपुरी प्रकल्पाची अवस्था बिकट झाली होती़ मागील १५ वर्षांत प्रथमच विष्णूपुरी प्रकल्पात शून्य टक्के साठा शिल्लक राहिला होता़ त्यामुळे पाणीटंचाईचे मोठे संकट नांदेडसह, ग्रामीण भागात निर्माण झाले होते़ गत चार वर्षांपासून दुष्काळासोबत लढणाºया ग्रामीण भागातील नागरिकांसमोर यंदाही मोठे आव्हान निर्माण झाले होते़
त्यामुळे पावसाची प्रतीक्षा करण्यात येत होती़ नाशिक विभागात झालेल्या पावसाने गोदावरीचे नदीपात्र वाहू लागले़ त्यामुळे जायकवाडी धरण भरले़ या पाण्यामुळे अर्ध्या मराठवाड्याची तहान भागली़ मात्र नांदेड जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प रिकामे होते़ दरम्यान, जिल्ह्यात शेवटच्या टप्प्यात पावसाने दिलासा दिल्याने पाणीटंचाईचे संकट दूर झाले असून नद्या, नाल्या व बंधारे भरले आहेत़ काही ठिकाणी अजूनही पावसाची गरज आहे़ गुरूवारी झालेल्या पावसामुळे जिल्ह्याची टक्केवारी वाढली असून आतापर्यंत सरासरी ८७ टक्के पाऊस झाला आहे़ हस्ताच्या पावसाने ही टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे़ परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील एकूण पावसाची सरासरी वाढल्यास प्रकल्पातील साठ्यात होण्याची अपेक्षा आहे़
सध्या मानार प्रकल्पात उपयुक्त साठा १०२़६५ दलघमी, विष्णूपुरी प्रकल्पात ८०़७९, नऊ मध्यम प्रकल्पांत ७०़२८, आठ उच्च पातळी बंधाºयांत ५८़८० व ५८ लघू प्रकल्पांत १०५़३३ दलघमी पाणीसाठा उपलब्ध झाला आहे़ मात्र चार कोल्हापुरी बंधारे अद्यापही कोरडेच आहेत़ मागील वर्षी २० सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांत ३९१़ ५६ दलघमी साठा उपलब्ध झाला होता. यावर्षी २० सप्टेंबरपर्यंत ४१८़३७ दलघमी पाणी उपलब्ध झाले आहे़ सप्टेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यातील प्रकल्पांत गतवर्षीपेक्षा चांगला पाणीसाठा आहे़ त्यामुळे दिलासा मिळाला.
विष्णूपुरी प्रकल्पामधील पाणी उपसून लाभक्षेत्रातील गावतळ्यामध्ये व लाभक्षेत्रामध्ये सोडण्याची पायाभूत सुविधा आहे़ त्यामुळे खरीप, रबी व उन्हाळी अशा तीन हंगामात हे पाणी उपसून ग्रामीण भागात सोडले जाऊ शकते़ परंतु त्यादृष्टीने नियोजन करावे, अशी मागणी पुढे येत आहे़
आतापर्यंत जिल्ह्यात ६८५ मि़मी़पाऊस
यंदा मृगासह आर्द्रा व इतर नक्षत्र कोरडेच गेले होते़ त्यामुळे शेतकºयांसह सर्वांच्याच तोंडचे पाणी पळाले होते़ परंतु, आॅगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पावसाने जोरदार बॅटिंग केली़ त्यामुळे जिल्ह्यात ९५५ मि़मी़सरासरीच्या आतापर्यंत ६८५ मि़मी़पावसाची नोंद झाली आहे़ सरासरी गाठण्यासाठी अद्यापही २७० मि़मी़पावसाची गरज आहे़ विष्णूपुरी प्रकल्पक्षेत्रात यंदा तुलनेत कमी पाऊस झाला असला तरी, नाशिकमध्ये पडलेल्या पावसाने जायकवाडी धरण शंभर टक्के भरले़ त्यामुळे जायकवाडीतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला़ हे पाणी विष्णूपुरीला मिळाले़ काही दिवसांपूर्वी विष्णूपुरी प्रकल्पक्षेत्रातही चांगला पाऊस झाल्याने विष्णूपुरी प्रकल्प भरला.