नांदेड जिल्ह्यात दोन वर्षांत ६१० दुचाकी लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 12:28 AM2019-01-07T00:28:33+5:302019-01-07T00:29:02+5:30
गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यातून तब्बल ६१० दुचाकी चोरीच्या घटना घडल्या आहेत़ यातील फक्त ११० चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलीस दलाला यश आले आहे़ गेल्या काही महिन्यांत तर दररोज शहर व जिल्ह्यात किमान दोन दुचाकी चोरीच्या घटना घडत आहेत़
नांदेड : गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यातून तब्बल ६१० दुचाकी चोरीच्या घटना घडल्या आहेत़ यातील फक्त ११० चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलीस दलाला यश आले आहे़ गेल्या काही महिन्यांत तर दररोज शहर व जिल्ह्यात किमान दोन दुचाकी चोरीच्या घटना घडत आहेत़ चोरीच्या या दुचाकींची शेजारील राज्यात विक्री करण्यात येत असून यासाठी मोठी टोळीच सक्रिय झाली आहे़
शहरात होणारी दुचाकी चोरी ही पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहे़ बाजारपेठेत लावलेल्या दुचाकी भरदिवसा चोरटे लंपास करीत आहेत़ विशेष म्हणजे, या दुचाकीचोरीचा गुन्हा तब्बल आठ ते दहा दिवसानंतर दाखल करण्यात येतो़ तोपर्यंत चोरट्याकडून त्या दुचाकीची सहजपणे विल्हेवाट लावली जाते़ २०१७ या वर्षात असे एकूण ३३३ गुन्हे दाखल झाले होते़ त्यापैकी ६५ गुन्हे उघडकीस आले होते़ तर २०१८ या वर्षात २७७ गुन्ह्यांपैकी फक्त ४५ गुन्हे उघड झाले आहेत़ २०१७ च्या तुलनेत २०१८ मध्ये गुन्ह्यांची संख्या घटली असली तरी, जबरी चोरी अन् घरफोडीचे प्रमाण कायम आहे़ २०१८ या वर्षात जिल्ह्यात दिवसा घरफोडीच्या ३९ तर रात्रीच्या वेळच्या १९५ चोरीच्या घटना घडल्या आहेत़ तर इतर चोरीच्या ५७३ घटना घडल्या आहेत़
यामध्ये कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे़ ५६ जणांचा खून झाला असून ७० जणांवर जिवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला करण्यात आला आहे़ बलात्काराचे गुन्हेही वाढले असून वर्षभरात असे ७० गुन्हे नोंदविण्यात आले आहेत़ तर छेडछाडीच्या घटनेचे १९२ गुन्हे नोंद झाले आहेत़ दरोड्याचे प्रमाणही २०१७ पेक्षा वाढून ते १५ पोहोचले आहे़
अपघातामुळे मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी २४६ जणांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत़ जुगाऱ्याच्या गुन्ह्यातही २०१८ या वर्षात मोठी वाढ झाली आहे़ जुगाराचे ७१३ गुन्हे नोंदविण्यात आले असून काही दिवसांपूर्वी अट्टल असलेल्या जुगाºयांना तडीपार करण्यात आले आहे़
२०१८ मध्ये दंगलीचे ३१२ गुन्हे
२०१७ च्या वर्षभरात नांदेड जिल्ह्यात दंगल घडवून सामाजिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी १९४ गुन्हे नोंदविण्यात आले होते़ २०१८ या वर्षात मात्र त्यामध्ये वाढ होवून ते ३१२ पर्यंत पोहोचले होते़ वर्षभरात विविध आंदोलनादरम्यान, दगडफेक, जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या़ या प्रकरणात पोलिसांनी दंगलखोरांविरुद्ध कारवाई केली़