नांदेड जिल्हा बँक निवडणुकीत थेट लढती रंगणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:16 AM2021-03-24T04:16:18+5:302021-03-24T04:16:18+5:30
जिल्हा बँकेच्या निवडणूक रणधुमाळीत आता मुदखेडमध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे यांची लढत गांधीजी बाबुराव पवार यांच्याशी होणार आहे. तर ...
जिल्हा बँकेच्या निवडणूक रणधुमाळीत आता मुदखेडमध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे यांची लढत गांधीजी बाबुराव पवार यांच्याशी होणार आहे. तर अर्धापूरमध्ये बाबुराव कदम व डॉ. लक्ष्मणराव इंगोले यांच्यात लढत होईल. कंधारमध्ये खासदारपुत्र प्रवीण पाटील यांच्या विरोधात माधवराव पांडागळे हे उमेदवार आहेत तर लोहा तालुक्यातून खा. प्रताप पाटील चिखलीकर यांच्या विरोधात ललिताबाई सूर्यवंशी या रिंगणात उतरल्या आहेत. बिलोलीत माजी खा.भास्करराव पाटील खतगावकर हे बिनविरोध निवडले आहेत. माजी संचालक लक्ष्मणराव ठक्करवाड, शिवाजी पाटील आणि मारोती येंबलवाड या तीन उमेदवारांनी अर्ज मागे घेतले.
नायगावमध्ये जिल्हा बँक निवडणुकीत प्रतिष्ठेची लढत होणार आहे. येथे माजी मंत्री गंगाधर कुंटूरकर विरुद्ध माजी आ. वसंतराव चव्हाण यांच्यात सामना रंगणार आहे. देगलूरमध्ये गोदावरीबाई सुगावे व विजयसिंह देशमुख यांच्यात लढत होईल. धर्माबादमध्ये मिर्झा गफार बेग यांचा सामना श्याम कदम यांच्यासमवेत होईल. हदगावमध्ये माजी आ. नागेश पाटील आष्टीकर यांनी बिनविरोध विजय मिळवला. हदगावमधून किशोर कदम व नागोराव वाकोडे यांनी आपले अर्ज मागे घेतले. उमरीमध्येही चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. येथे तीन उमेदवार रिंगणात आहेत. त्यात माजी आ.बापुसाहेब गोरठेकर यांचे पुत्र कैलास देशमुख गोरठेकर तसेच माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे यांचे चिरंजीव संदीप कवळे हे रिंगणात उतरले आहेत. या दोघांमध्येच लढत होईल, अशी अपेक्षा आहे. विनोद शिंदे हेही उमरीतून रिंगणात आहेत. माजी आ.हनुमंत पाटील आणि बँकेचे माजी संचालक गंगाधर राठोड यांच्यात मुखेडमध्ये लढत होईल. किनवटमध्येही बँकेचे माजी अध्यक्ष दिनकर दहिफळे विरुद्ध सुरेश रंगेनवार असा सामना रंगणार आहे. माहूरमध्ये राजेंद्र केशवे यांचा एकमेव अर्ज आहे.
महिला राखीव प्रवर्गातही थेट लढती होत आहेत. जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष डॉ. सुनील कदम यांच्या सौभाग्यवती डॉ. शिला कदम या नांदेड तालुक्यातून रिंगणात आहेत. त्यांचा सामना संगीता पावडे यांच्याशी होणार आहे. हिमायतनगरमध्ये अनुराधा पाटील विरुद्ध विजयाबाई शिंदे अशी लढत होईल. बँकेचे उपाध्यक्ष राहिलेले दिलीप कंदकुर्ते यांचा सामना शिवराम लुटे यांच्याशी होईल तर इतर सहकारी संस्था प्रवर्गात मोहन पाटील विरुद्ध व्यंकटेश जिंदम यांच्यात लढत होईल. अनुसूचित जाती जमाती राखीव प्रवर्गात सविता मुसळे, लक्ष्मणराव ठक्करवाड व विजय सोनवणे हे तीन उमेदवार रिंगणात आहेत. इतर मागासवर्गीय प्रवर्गात हरिहरराव भोसीकर विरुद्ध उमाकांत गोपछडे असा थेट सामना होईल. भटक्या विमुक्त जाती जमाती व विशेष मागास प्रवर्गात व्यंकटराव जाळणे, इश्वर चव्हाण आणि अगडमदास शिनगारे या तीन उमेदवारात लढत होणार आहे.