नांदेड जिल्ह्यात कर्जमाफीच्या माहितीचा ताळमेळ बसेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 12:31 AM2018-01-22T00:31:09+5:302018-01-22T00:31:28+5:30
शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमागे लागलेले शुक्लकाष्ठ संपता संपेना झाले आहे. आता शेतक-यांनी पोर्टलवरील आॅनलाईन भरलेली माहिती आणि मध्यवर्ती सहकारी बँकांनी भरलेली माहिती यांचा ताळमेळ न बसल्यामुळे अनेक शेतक-यांना या योजनेचा अद्यापपर्यंत लाभ मिळाला नाही़ त्यामुळे अशा शेतक-यांची यादीच आता जिल्हा बँकेने प्रकाशित केली आहे़ आवश्यक कागदपत्रांसह संबंधित शेतक-यांना आता बँक गाठून त्याची पूर्तता करावी लागणार आहे़ त्यासाठी पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमागे लागलेले शुक्लकाष्ठ संपता संपेना झाले आहे. आता शेतक-यांनी पोर्टलवरील आॅनलाईन भरलेली माहिती आणि मध्यवर्ती सहकारी बँकांनी भरलेली माहिती यांचा ताळमेळ न बसल्यामुळे अनेक शेतक-यांना या योजनेचा अद्यापपर्यंत लाभ मिळाला नाही़ त्यामुळे अशा शेतक-यांची यादीच आता जिल्हा बँकेने प्रकाशित केली आहे़ आवश्यक कागदपत्रांसह संबंधित शेतक-यांना आता बँक गाठून त्याची पूर्तता करावी लागणार आहे़ त्यासाठी पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली आहे़
राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची घोषणा केली़ आतापर्यंतची सर्वात मोठी ऐतिहासिक कर्जमाफी असाही तिचा गवगवा करण्यात आला़ त्यासाठी शेतक-यांना आपले सरकार या पोर्टलवर आॅनलाईन माहिती भरण्यासाठी बराच घाम गाळावा लागला़
अनेक शेतक-यांना तर जागरण करण्याची वेळही आली़ या योजनेत शेतक-यांना दीड लाख रुपयापर्यंतचे कर्ज माफ तर नियमित कर्जफेड करणाºया शेतक-यांना प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येत आहे़ नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत ८३ हजार शेतक-यांच्या खात्यात ३९६ कोटी ४२ लाख रुपये जमा करण्यात आले़ या योजनेत शेतक-यांनी कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज दाखल केले़ बँक स्तरावरुन कर्जाची माहिती लेखापरीक्षण करुन लाभार्थी शेतक-यांनी ग्रीन लिस्ट बँकांना देण्यात आली़ परंतु आॅनलाईन अर्ज भरताना किंवा बँकांकडून माहिती भरताना त्रुटी राहिल्या असल्यास त्या तालुकास्तरीय समितीकडून दुरुस्ती करण्याचे काम डिसेंबरमध्ये हाती घेण्यात आले होते़
परंतु जानेवारी संपत आला तरी अनेक शेतक-यांच्या माहितीबाबत ताळमेळ बसेना झाला आहे़ शेतक-यांनी पोर्टलवर दाखल केलेली माहिती आणि बँकांनी दाखल केलेली माहिती यांची सांगड घालण्यात आली, परंतु त्यामध्ये अनेक शेतकºयांच्या माहितीमध्ये तफावत आढळून येत आहे़ त्यामुळे अशा शेतक-यांची यादीच शासनाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे पाठविली आहे़
ही यादी शाखास्तरावर प्रसिद्ध करण्यात आली आहे़ आॅनलाईन पोर्टलवर अर्ज केलेल्या ज्या शेतक-यांना अद्यापही कर्जमाफी किंवा प्रोत्साहनपर योजनेचा लाभ मिळाला नाही़ अशा शेतक-यांनी त्वरित बँकेशी संपर्क साधून यादीत आपले नाव पहावे़ त्यानंतर बँकेकडे आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी, असे आवाहन करण्यात आले आहे़
येत्या पंधरा दिवसांत शेतक-यांना या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे़ त्यामुळे पुन्हा एकदा शेतक-यांना बँकांचे उंबरठे झिजवावे लागणार आहेत़.