नांदेड जिल्ह्यात तूर खरेदीला नाफेडला मुहूर्त सापडेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2020 01:41 PM2020-02-06T13:41:15+5:302020-02-06T13:43:32+5:30

आधारभूत किंमत मिळेना : बाजार समितीच्या दुर्लक्षाने व्यापाऱ्यांची चांदी

Nanded district does not have immediate access to purchase tur by NAFED | नांदेड जिल्ह्यात तूर खरेदीला नाफेडला मुहूर्त सापडेना

नांदेड जिल्ह्यात तूर खरेदीला नाफेडला मुहूर्त सापडेना

Next
ठळक मुद्देनाफेडकडून नोंदणी सुरू परभणी, हिंगोलीपेक्षाही नांदेडात तूर उत्पादक शेतकऱ्यांची नोंदणी कमी

- श्रीनिवास भोसले

नांदेड :  केंद्र शासनाच्या आधारभूत किंमतीनुसार जिल्ह्यात तूर खरेदीसाठी नाफेड मार्केटींग फेडरेशनमार्फत आॅनलाईन नोंदणी सुरू करण्यात आली आहे़ परंतु, आजपर्यंत प्रत्यक्षात तूर खरेदीसाठी मुहूर्त सापडलेला नाही़ त्यामुळे हवालदिल झालेल्या तूर उत्पादक शेतकऱ्यांची बेभाव तूर खासगी व्यापाऱ्यांच्या घशात जात आहे़ 

नांदेड जिल्ह्यात सोयाबीन पाठोपाठ तुरीचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे़ दोन वर्षापूर्वी नाफेडकडून तूर खरेदीसाठी मोठी दिरंगाई झाली होती़ जवळपास दहा हजार क्विंटल तूर खरेदीविना अनेक दिवस पडून होती़ बारदाना उपलब्ध होवू शकला नसल्याने खरेदीस विलंब झाल्याचे संबंधितांकडून सांगण्यात येत होते़ परंतु, तेव्हापासून नाफेडवरील शेतकऱ्यांचा विश्वास उडाल्याचे मागील दोन वर्षातील आकडेवारीवरून दिसत आहे़ 

मागील वर्षाप्रमाणे यंदाही नाफेडकडे तूर उत्पादक शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याचेच आकडेवारीवरून दिसत आहे़ आजपर्यंत केवळ २ हजार ३३० शेतकऱ्यांनी तूर खरेदीसाठी आॅनलाईन नोंदणी केली आहे़ नांदेडपेक्षा जास्त हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात नोंदणी झाली आहे़ दोन्ही जिल्ह्यात प्रत्येकी सहा हजारांवर शेतकऱ्यांनी आजपर्यंत आॅनलाईन नोंदणी केली आहे़ केंद्र शासनाकडून दिला जाणारा आधारभूत भाव मिळविण्यासाठी नाफेडकडेच खरेदी करणे गरजेचे आहे़ व्यापाऱ्यांना आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने शेतमालाची खरेदी करू नये, असे आदेश देवूनही व्यापारी आपली मनमानीने खरेदी करीत आहेत़ आॅनलाईन नोंदणी १४ फेब्रुवारीपर्यंत करता येणार आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांनी  नोंदणी करून आधारभूत किमतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे़  

दरम्यान, नांदेड जिल्ह्यात आजपर्यंत हदगाव नाफेड खरेदी केंद्रावर १ हजान ९९ शेतकऱ्यांनी, किनवट ६३८, मुखेड - ४९३ तर नांदेड खरेदी केंद्रावर केवळ १०० शेतकऱ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे़परभणी जिल्ह्यात आजपर्यंत ६ हजार ३६४ शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी आॅनलाईन नोंदणी केली आहे़ यामध्ये सर्वाधिक जिंतूर- २ हजार ६८, परभणी - १८३४, सेलू- ६२९, पालम - ५३५, सेलू- ६२९, पाथरी - १६६, पूर्णा- ८७३ तर सोनपेठ केंद्राकडे २५९ शेतकऱ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे़ तसेच हिंगोली  केंद्रावर २ हजार ५३, वसमत - ८३३, कळमनुरी - १४०९, कन्हेरगाव - ३६, जवळा बाजार - १५७० तर सेनगाव केंद्राकडे २८१ अशाप्रकारे एकूण ६ हजार १८२ शेतकऱ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे़ 

नोंदणीसाठीची आवश्यक कागदपत्रे
शेतकऱ्यांनी तूर खरेदीसाठी सातबारा उतारा, चालू बँक खाते पासबुक प्रत, आधारकार्ड या कागदपत्रांची आवश्यकता असून आॅनलाईन नोंदणी करावी लागणार आहे़ त्यानंतर सदर शेतकऱ्यांना एसएमएस येईल़ त्यानंतर शेतकऱ्यांनी शेतमाल स्वच्छ करून व वाळवून खरेदी केंद्रावर घेवून यावा़ माल खरेदी झाल्यानंतर त्वरी आॅनलाईन काटा पट्टी घ्यावी़

आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने तूर खरेदी करू नये, असे आदेश नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीने देवूनसुद्धा व्यापाऱ्यांकडून कवडीमोल दराने तूर खरेदी करत आहे़ केंद्र शासनाने तुरीसाठी प्रतिक्विंटल ५ हजार ८०० रूपये भाव जाहीर केला आहे़ तूर खराब अथवा ओली असल्याचे कारण देत कमी दराने खरेदी केली जात आहे़ नांदेडच्या नवीन मोंढ्यात बुधवारी व्यापाऱ्यांकडून सर्वाधिक भाव प्रतिक्विंटल ४ हजार ९५० रूपये देण्यात आला़ आजघडीला नवीन मोंढ्यात प्रतिदिन सरासरी २०० कट्टा तुरीची आवक सुरू झाली आहे़ दोन वर्षापूर्वी नोंदणी करूनही अनेकांची तूर गेली नव्हती तर गतवर्षी चुकारे अदा करण्यास विलंब झाल्याने शेतकरी नाफेडकडे पाठ फिरवत आहेत़ 

काळजी घेणे गरजेचे
या योजनेमध्ये आॅनलाईन काटा पट्टी ग्राह्य धरण्यात येणार आहे़ शेतमालाची रक्कम आपण दिलेल्या बँक खाती आॅनलाईन पद्धतीने जमा होणार आहे़ त्यामुळे बँक खात्याची माहिती बिनचुक द्यावी़ अन्यथा आपली रक्कम जमा होण्यास विलंब होईल किंवा चुकीच्या बँक खात्यामध्ये रक्कम वर्ग होवू शकते़ तसेच लवकरच नाफेडमार्फत खरेदीप्रक्रिया सुरू होईल, असेही जिल्हा मार्केटींग अधिकारी सुधीर पाटील यांनी सांगितले़ 

Web Title: Nanded district does not have immediate access to purchase tur by NAFED

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.