नांदेड जिल्ह्यात दोन लाचखोर जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 01:22 AM2018-10-14T01:22:01+5:302018-10-14T01:22:27+5:30
जिल्ह्यातील तामसा येथे वनरक्षकाला अडीच हजार रुपये तर बिलोली तालुक्यातील केसराळी येथे ग्रामसेवकाला दोनशे रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले़ या प्रकरणात दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड/बिलोली : जिल्ह्यातील तामसा येथे वनरक्षकाला अडीच हजार रुपये तर बिलोली तालुक्यातील केसराळी येथे ग्रामसेवकाला दोनशे रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले़ या प्रकरणात दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे़
तेंदूपाने जमा केल्याची नोंद घेण्यासाठी पाच हजार रुपये लाचेची मागणी करुन तडजोडीअंती अडीच हजार रुपये स्वीकारणाऱ्या वनरक्षक नितीन चनबस स्वामी याला लाचलुचपत प्रतिबंधकच्या पथकाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु होती़
वनपरिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक कार्यालय, हदगावअंतर्गत तामसा, माळेगाव बिटचे वनरक्षक नितीन स्वामी यांच्याकडे त्यांचे व त्यांच्या सोबतच्या मजुराचे प्रोत्साहनात्मक रकमेचा धनादेश जमा केल्याचे व चालू वर्षी रजिस्टरमध्ये तेंदूपाने जमा केल्याची खरी नोंद घेण्यासाठी तक्रारदाराकडे पाच हजार रुपये लाचेची मागणी केली होती़ तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत विभागाने तामसा येथील बसस्थानक परिसरात पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली़
तडजोडीअंती अडीच हजार रुपये देण्याचे ठरले़ १३ आॅक्टोबर रोजी तामसा बसस्थानक परिसरात सापळा रचण्यात आला़ यावेळी वनरक्षक नितीन स्वामी याला अडीच हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले़
याप्रकरणी तामसा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु होती़ पोलीस अधीक्षक संजय लाठकर यांच्या मार्गदर्शनाखाली, उपअधीक्षक विजय डोंगरे, पोना़ साजीद अली, शेख चाँद अली साब, सुरेश पांचाळ, अमरजितसिंघ चौधरी, शिवहार किडे यांचा या कारवाईत सहभाग होता़
तर दुसºया घटनेत, बिलोली तालुक्यातील केसराळी येथील ग्रामरोजगार सेवक वीरभद्र हणमंतराव घंटे यांनी प्रधानमंत्री घरकुल यादी प्रपत्र ‘ड' आॅनलाईन करण्यासाठी २०० रुपयांची लाच घेताना नांदेड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडून कारवाई केली़ सदर घटना १३ आॅक्टोबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली आहे.
१५ आॅगस्टपासून बिलोली तालुक्यात प्रधानमंत्री प्रपत्र ‘ड' च्या घरकुल यादीत नावे आलेल्या लाभार्थ्यांची माहिती आॅनलाईन केली जात आहे.
तालुक्यात सर्वत्र होत असलेल्या आॅनलाईन यादीसाठी संबंधित परिचारक लाभार्थ्यांकडून पैसे घेत असल्याची चर्चा असतानाच नांदेड येथील लाचलुचपत प्रतिबंधक अधिकारी बी.एल.पेडगावकर यांच्या टीमने सापळा रचून आरोपी ग्रामरोजगारसेवक वीरभद्र घंटे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे़ याप्रकरणी बिलोली पोलिसांत ग्रामरोजगार सेवकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.