नांदेड जिल्हा मजूर फेडरेशन महाविकास आघाडीच्या ताब्यात
By शिवराज बिचेवार | Published: May 15, 2023 07:03 PM2023-05-15T19:03:23+5:302023-05-15T19:04:16+5:30
मतदारांनी उस्फुर्त प्रतिसाद दाखविल्याने टक्केवारी ९९ पर्यंत गेली होती.
नांदेड- जिल्हा मजूर फेडरेशनच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने नऊ जागा जिंकत सत्ता राखली आहे. तर भाजपाला ६ जागी यश मिळाले असून त्यातील दोन जागांवर ईश्वर चिठ्ठीने भाजपाला लॉटरी लागली असली तरी, सत्तेपर्यंत मात्र पोहचता आले नाही. बहुचर्चित नांदेड जिल्हा मजूर फेडरेशनची निवडणुक अत्यंत चुरशीची झाली.
रविवार १४ मे रोजी १३ जागांसाठी मतदान घेण्यात आले. मतदारांनी उस्फुर्त प्रतिसाद दाखविल्याने टक्केवारी ९९ पर्यंत गेली होती. तर दोन सदस्य बिनविराेध निवडून आले होते. सोमवारी सकाळपासून मतमोजणीला सुरुवात करण्यात आली. त्यात काँग्रेसने नऊ जागांवर यश मिळविले. भाजपाला ६ जागा मिळाल्या असून दोन जागा या ईश्वर चिठ्ठीने भाजपाच्या खात्यात जमा झाल्या. महाविकास आघाडीच्या विजयी उमेदवारांमध्ये लक्ष्मीकांत गोणे २३ मतांनी विजयी झाले. प्रदीप पाटील-१७, उत्तम राठोड-९, रामलू इरतेपवार बिनविरोध, अनिता येवले-१०९, मुकुंद जवळगांवकर-१२३, शाहूराज गायकवाड-१३५, भारत रॅपनवाड- १२६ तर साजेदा बेगम शौकत खान या १२८ मतांनी विजयी झाल्या आहेत.
भाजपाचे मिलिंद देशमुख-२० मतांनी विजयी झाले. तर प्रताप सोळंके-६, दिगांबर पवळे-८, रामराव सूर्यवंशी बिनविरोध, मनोहर भोसीकर आणि उमाकांत दबडे यांना ईश्वर चिठ्ठी काढून विजयी घोषित करण्यात आले. त्यानंतर महाविकास आघाडीच्या विजयी उमेदवारांनी जल्लोष केला. यावेळी माजी मंत्री डी.पी.सावंत, आ.मोहन हंबर्डे, माजी सभापती किशोर स्वामी, आनंद चव्हाण, डॉ.विठ्ठल पावडे यांची उपस्थिती होती.