नांदेड जिल्ह्यात दहा लाख घनमीटर गाळ उपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 12:50 AM2018-04-19T00:50:33+5:302018-04-19T00:50:33+5:30
जिल्ह्यात गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या योजनेला शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून मार्चपासून सुरू झालेल्या या कामामध्ये राज्यात सर्वाधिक १० लाख ४८ हजार घनमीटर गाळ जिल्ह्यातील ३२ तलावांतून उपसण्यात आला आहे. जवळपास दीड लाख ट्रॅक्टर गाळ शेतक-यांनी आपल्या शेतात नेला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : जिल्ह्यात गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या योजनेला शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून मार्चपासून सुरू झालेल्या या कामामध्ये राज्यात सर्वाधिक १० लाख ४८ हजार घनमीटर गाळ जिल्ह्यातील ३२ तलावांतून उपसण्यात आला आहे. जवळपास दीड लाख ट्रॅक्टर गाळ शेतक-यांनी आपल्या शेतात नेला आहे.
जिल्ह्यात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत ४६ तलावांतील गाळ काढण्याच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यापैकी आजघडीला ३२ तलावांतून गाळ काढण्याचे काम सुरू आहे. जवळपास ५० हून अधिक पोकलेन व जेसीबी मशीनद्वारे गाळ काढण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ३२ तलावांतून १० लाख ४८ हजार घनमीटर गाळ काढण्यात आला आहे.
गाळ काढण्याचे हे काम संपूर्ण लोकसहभाग आणि प्रशासकीय पातळीवर अशा दोन टप्प्यांत सुरू आहे. संपूर्ण लोकसहभागाअंतर्गत सुरू असलेल्या कामामध्ये प्रशासनाकडून तांत्रिक मार्गदर्शन केले जात आहे.
यासाठी मानव लोक सेवाभावी संस्था, अनुलोम सेवाभावी संस्था आणि सगरोळी सांस्कृतिक मंडळ सगरोळीचे येथील संस्थांचे सहाय मिळत आहे. तर प्रशासकीय पातळीवरील कामामध्ये तांत्रिक मार्गदर्शनासह ११.५७ पैसे प्रति घनमीटर दराने जेसीबींना भाडे दिले जात आहे. जिल्ह्यात झालेल्या गाळमुक्त धरण योजनेत राज्यात सर्वाधिक गाळ नांदेड जिल्ह्यातून काढल्याची माहितीही जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली आहे.
जिल्ह्यात गाळमुक्त धरण योजनेअंतर्गत निघणारा गाळ घेवून जाण्यासाठी शेतकºयांनी तितकाच उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. त्यातून गाळयुक्त शिवार ही संकल्पनाही प्रत्यक्षात येत आहे. गाळ नेलेल्या अनेक शेतकºयांनी आपल्या शेतातून पिकांचे उत्पन्न वाढल्याचे सांगितले आहे.
तलावातील गाळ काढण्यास चांगला प्रतिसाद मिळत असला तरीही त्यासाठी आवश्यक ती मशिनरी उपलब्ध नसल्याने या कामाला म्हणावी तितकी गती आली नसल्याची बाबही पुढे आली आहे. गाळमुक्त धरणासाठी शासनस्तरावर निधीची कमतरता नसली तरीही तांत्रिक साहित्य उपलब्ध होत नाही. या कामासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढे येण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. त्याचवेळी शिर्डी संस्थान आणि सिद्धीविनायक ट्रस्टकडेही मदत मागण्यात आल्याचे डोंगरे यांनी सांगितले.
मानार धरणातून पहिल्यांदाच गाळ उपसा
जिल्ह्यात सर्वात मोठे धरण असलेल्या मानार प्रकल्पातील गाळ उपसा करण्याचे कामही सुरू झाले आहे. या धरणाच्या निर्मितीपासून म्हणजेच १९६२ पासून पहिल्यांदाच या धरणातील गाळ काढला जात आहे. मानार धरणात जवळपास २५ लाख घनमीटर गाळ असल्याचा अंदाज सिंचन विभागाने व्यक्त केला आहे. या धरणातून गाळ काढल्यानंतर पाणी उपलब्धता वाढणार आहे. विष्णूपुरी प्रकल्पातील गाळ उपसा करण्याबाबत नियोजन केले जात आहे. मात्र विष्णूपुरीत नांदेड शहरासाठी पाण्याचा साठा आहे. त्यामुळे याबाबत मे अखेरीस हालचाली होतील़ विष्णूपुरी प्रकल्पाच्या दरवाजा क्र. १८ च्या दुरुस्तीबाबतही प्रक्रिया सुरू आहे.