नांदेड जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांसाठी येणार ६०० मे. टन तूरडाळ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2017 12:28 PM2017-12-08T12:28:02+5:302017-12-08T12:31:15+5:30
राज्यात गतवर्षी तुरीचे विक्रमी उत्पादन झाल्याने बाजारात तुरीची आवक वाढली असून केंद्र व राज्य शासनामार्फत वेगवेगळ्या योजनेअंतर्गत तुरीची हमीभावाने खरेदी केली आहे. ही तूरडाळ आता स्वस्तधान्य दुकानावर उपलब्ध होणार असून जिल्ह्यात ६०० मे. टन तुरीची मागणी करण्यात आली आहे.
नांदेड : राज्यात गतवर्षी तुरीचे विक्रमी उत्पादन झाल्याने बाजारात तुरीची आवक वाढली असून केंद्र व राज्य शासनामार्फत वेगवेगळ्या योजनेअंतर्गत तुरीची हमीभावाने खरेदी केली आहे. ही तूरडाळ आता स्वस्तधान्य दुकानावर उपलब्ध होणार असून जिल्ह्यात ६०० मे. टन तुरीची मागणी करण्यात आली आहे.
तुरीची बाजारातील आवक मोठ्या प्रमाणात होत असल्याने तुरीसाठी निश्चित केलेल्या किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी बाजारभाव शेतक-यांना मिळत होता. ही बाब लक्षात घेऊन शासनाने तुरीची खरेदी केली. राज्यात स्वत:च्या निधीतून राज्य शासनाने बाजार हस्तक्षेप योजनेअंतर्गत २५.२५ लाख क्विंटल तूर खरेदी केली आहे. या तुरीची भरडाई करण्यासही परवानगी दिली आहे. भरडाई केलेली ही तूरडाळ विक्री करण्यास परवानगी दिली आहे. त्याचप्रमाणे ही तूरडाळ आता राज्यातील स्वस्तधान्य दुकानातही उपलब्ध होणार आहे.
जिल्ह्यात असलेल्या शिधापत्रिकाधारकांना प्रतिकार्ड १ किलो तूरडाळ दिली जाणार आहे. जिल्ह्यात जवळपास ६ लाख शिधापत्रिकाधारक आहेत. त्यामध्ये अंत्योदय अन्न योजनेच्या शिधापत्रिकांची संख्या ८० हजार ४७५, प्राधान्य कुटुंब योजनेच्या शिधापत्रिकांची संख्या ४ लाख २ हजार ७०९ इतकी आहे. या शिधापत्रिकाधारकांसाठी नांदेड जिल्हा पुरवठा विभागाने ४ हजार ८३२ क्विंटल तूरडाळीची मागणी केली आहे. ही तूरडाळ लवकरच स्वस्तधान्य दुकानात उपलब्ध होईल, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर यांनी दिली.
स्वस्तधान्य दुकानात ही तूरदाळ ५० रुपये किलो याप्रमाणे उपलब्ध करुन दिली जाणार आहे. दरम्यान, स्वस्तधान्य दुकानात मिळणारी तूरदाळ ५० रुपये किलो या दराने मिळणार असली तरी बाजारात ५१ रुपये ते ६१ रुपये किलो या प्रमाणे डाळ मिळत आहे. त्यातही आजघडीला फटका प्रकारातील तूरडाळ ही ५८ रुपय किलो तर सव्वानंबर प्रकारातील तूरडाळ ५३ रुपये किलो प्रमाणे मिळत आहे. त्याचवेळी स्वस्तधान्य दुकानात तूरडाळ उपलब्ध झाल्याने तुरडाळीचे बाजारभाव काही प्रमाणात उतरतील, अशी अपेक्षा आहे. पण त्याचवेळी स्वस्तधान्य दुकानातील तूरडाळ ही कशी राहील, यावरही बरेच काही अवलंबून राहणार आहे. स्वस्तधान्य दुकान आणि बाजारात मिळणाºया तूरडाळीच्या भावामध्ये थोडाच फरक आहे. स्वस्तधान्य दुकानात मिळणाºया तूरडाळीच्या किमतीवर मात्र निश्चितच नियंत्रण राहणार आहे.
विक्रमी उत्पन्नाने येणार वरणाला येणार चव
सर्वसामान्यांसह प्रत्येक घरांतील जेवणात वरणाला महत्व आहे. ते आवश्यकही आहे. वर्ष-दीड वर्षांपूर्वी तूरडाळीचे भाव गगनाला भिडले होते. तब्बल २०० रुपये किलोदराने तूरडाळ मिळत होती. त्यामुळे सामान्यांच्या ताटातून वरण बाजूला झाले होते. आतामात्र प्रत्येकाच्या जेवणामधील वरणाला चव येणार आहे. तुरीच्या विक्रमी उत्पादनाने ही परिस्थिती बदलली आहे.