नांदेड जिल्ह्यात प्रस्थापितांना मतदारांनी नाकारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:20 AM2021-01-19T04:20:25+5:302021-01-19T04:20:25+5:30
देगलूर तालुक्यातील करडखेड येथील विद्यमान सरपंच व भाजयुमोचे तालुकाध्यक्ष पंकज देशमुख यांचे पॅनल पराभूत झाले. त्यांच्या पॅनलला ९पैकी २ ...
देगलूर तालुक्यातील करडखेड येथील विद्यमान सरपंच व भाजयुमोचे तालुकाध्यक्ष पंकज देशमुख यांचे पॅनल पराभूत झाले. त्यांच्या पॅनलला ९पैकी २ जागा मिळाल्या. अंतापूर (ता. देगलूर) येथील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा कार्यकर्ते हणमंत डोपेवाड यांचे पॅनल विजयी झाले. अंतापूर हे गाव आ. रावसाहेब अंतापूरकर यांचे आहे. येेथे त्यांच्या पॅनलला तीन जागा मिळाल्या, तर डोपेवाड यांच्या पॅनलला चार जागा मिळाल्या. सुगाव (ता. देगलूर) येथील भाजपा कार्यकर्ते व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती मोहिते पाटील यांच्या पॅनलला सर्वच्या सर्व ९ जागा मिळाल्या. काँग्रेस कार्यकर्ते गिरीधर पाटील यांचा येथे पराभव झाला.
हदगाव तालुक्यातील निवघा ग्रामपंचायत बाबुराव कदम आणि पंचायत समितीचे माजी सभापती बाळासाहेब कदम यांच्या ताब्यात गेली. त्यांच्या पॅनलचे १५पैकी १४ जण निवडून आले. शिरड येथील ११पैकी ८ जागा अनिल पाटील यांच्या पॅनलला, संजय कल्याणकर यांच्या पॅनलला दोन, तर देवानंद कल्याणकर यांच्या पॅनलची एक जागा निवडून आली. उंचेगाव बु. (ता. हदगाव) येथील ग्रामपंचायत देवराव बंडे पॅनलच्या ताब्यात गेली. येेथे बंडे गटाचे ९पैकी ९ सदस्य निवडून आले. धानोरा रुई येथे ९ पैकी ८ जागा जिंकून लक्ष्मण शिंदे यांच्या पॅनलने वर्चस्व मिळविले. गजानन शिंदे यांच्या पॅनलची एक जागा निवडून आली.
जिल्ह्याचे लक्ष असलेल्या मुदखेड तालुक्यातील बारड ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात गेली. येथे बाळासाहेब देशमुख यांच्या पॅनलचे १७पैकी १६ जण निवडून आले.
धर्माबाद तालुक्यातील येताळा ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष पद्मावती सतपलवार यांचे वर्चस्व राहिले. त्यांच्या पॅनलने ११ पैकी ११ जागा मिळविल्या. तालुक्यातील अतकूर ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवला. येथे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गंगाधर तोटलोड व शिवसेनेचे पंचायत समिती सभापती मारोती कागेरू यांच्या पॅनलने बाजी मारली. बाभळी ध. ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात गेली. बाबुराव पाटील यांच्या पॅनलने सर्वच्या सर्व सात जागा जिंकल्या.
बिलोली तालुक्यातील कासराळी ग्रामपंचायतीमध्ये माजी आ. गंगाराम ठक्करवाड यांच्या गटास सात, तर अल्पसंख्याक काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष माजीद शेख यांच्या गटास सहा जागा मिळाल्या. आरळी ग्रामपंचायत निवडणुकीत सदाशिव पाटील बोडके गटाला सात, तर ओमप्रकाश पाटील बोडके गटाला सहा जागा मिळाल्या. येथे मोठ्या राजकीय पुढाऱ्यांचा पराभव झाला.
माहूर तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या आसाेली ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीने एकहाती सत्ता मिळविली. येथे राष्ट्रवादीचे ९पैकी ९ उमेदवार निवडून आले. आष्टा ग्रामपंचायतीमध्ये प्रा. राजेंद्र केशवे यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसप्रणित पॅनलनेही सर्वच्या सर्व ९ जागा पटकाविल्या.