नांदेड लोकसभेसाठी कोट्यधीशांमध्ये चुरस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 12:29 AM2019-03-27T00:29:38+5:302019-03-27T00:30:22+5:30
नांदेड लोकसभेसाठी दोन प्रमुख कोट्यधीश उमेदवारांमध्ये लढत होणार असून तिसरा उमेदवारही लखपती असल्याचे निवडणूक अर्ज सादर करताना दिलेल्या विवरणपत्रातून स्पष्ट होत आहे.
नांदेड : नांदेड लोकसभेसाठी दोन प्रमुख कोट्यधीश उमेदवारांमध्ये लढत होणार असून तिसरा उमेदवारही लखपती असल्याचे निवडणूक अर्ज सादर करताना दिलेल्या विवरणपत्रातून स्पष्ट होत आहे.
नांदेड लोकसभेसाठी ५९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यात काँग्रेसकडून अशोकराव चव्हाण, भाजपाकडून प्रताप पाटील चिखलीकर तर वंचित बहुजन आघाडीकडून प्रा. यशपाल भिंगे हे रिंगणात उतरले आहेत. या प्रमुख उमेदवारांपैकी काँग्रेसचे अशोक चव्हाण यांच्याकडे २३ कोटी २९ लाख ८६ हजार रुपयांची मालमत्ता असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. त्यात आजघडीला चव्हाण यांच्याकडे ४ लाख ८३ हजार ४६५ रुपये रोख आहेत. त्यांच्या सौभाग्यवती अमिता चव्हाण यांच्याकडे १ लाख ९१ हजार २०० रुपये रोख स्वरुपात उपलब्ध आहेत. चव्हाण यांच्या विविध बँक खाते, ठेवी, शेअर्स, बचत रक्कम आदींचा आकडा हा २ कोटी ५८ लाख ६३ हजार ७९० रुपये किमतीचा आहे. त्यात सोने, चांदी, हिऱ्यांचाही समावेश आहे. सोन्या-चांदीची किंमत २२ लाख ७९ हजार २६१ तर हिऱ्यांची किंमत २६ लाख ६० हजार ७९ रुपये इतकी आहे.
जमीन, शेती आदी मालमत्ताही चव्हाण यांच्याकडे उपलब्ध असून याची किंमत २० कोटी ६६ लाख ३९ हजार २४० रुपये दर्शविण्यात आली आहे. त्याचवेळी अशोकराव चव्हाण यांच्यावर २ कोटी ८१ लाख ९२ हजार रुपयांचे कर्जही असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे.
त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर हे कोट्यधीश आहेत. त्यांची एकूण संपत्ती ८ कोटी ५३ लाख ६३ हजार ८२५ रुपये इतक्या किमतीची आहे. त्यात प्रतापराव यांच्याकडे रोख २२ लाख ४३ हजार ५८६ रूपये आहेत. त्यांच्या सुविद्य पत्नी प्रतिभाबाई चिखलीकर यांच्याकडे २ लाख ३० हजार रुपयांची रोकड आहे. चिखलीकरांकडे ११ तोळे सोने असून त्याची किंमत ३ लाख ५२ हजार रुपये आहे. तर १५ लाख ६ हजार ६२ रुपयांच्या विविध ठेवीही आहेत. १६ हजार ८३५ रुपयांची गुंतवणूकही त्यांनी शेअर्स आदी माध्यमांतून केली आहे. विमा, बचत खाते आदींच्या माध्यमातून ३० लाख ७० हजार ९५२ रुपये त्यांनी गुंतवले आहेत. जवळपास ७२ लाख ५९ हजार रुपये किमतीची त्यांची एकूण संपत्ती आहे. चिखलीकरांकडे शेतजमीन तसेच वारसाप्रमाणे मालमत्ता उपलब्ध आहे. या मालमत्ताची किंमत ३० लाख रुपये दर्शविण्यात आली आहे. जमीन, निवासी इमारती आदी १ कोटी ३५ लाखांची मालमत्ताही चिखलीकर यांच्याकडे उपलब्ध आहे. चिखलीकर यांच्यावर ५ लाख ९४ हजार रुपयांचे कर्ज आहे.
नांदेड लोकसभा निवडणुकीतील तिसरे प्रमुख उमेदवार वंचित बहुजन आघाडीचे प्रा. यशपाल भिंगे हे लखपती असून त्यांच्याकडे ६९ लाख ८१ हजार रुपयांची एकूण संपत्ती आहे. भिंगे यांच्याकडे ३ लाख रुपये रोख आहेत. तर बँक खात्यात ३ लाख ५३ हजार ३५९ रुपये उपलब्ध आहेत.
तर वाहनांची किंमत ११ लाख ७४ हजार ६७६ रुपये इतकी आहे. त्यांच्याकडे दोन तोळे सोने उपलब्ध असून ६० हजार रुपये किंमत दर्शविण्यात आली आहे. भिंगे यांच्या इतर मालमत्तांमध्ये निवासी इमारतीची किंमत ५० लाख २० हजार रुपये इतकी आहे. भिंगे यांच्यावर २० लाख ५० हजार रुपयांचे कर्जही आहे.