नांदेडमधील शेतकऱ्याच्या लेकीचं अमेरिकेत उड्डाण; १४ व्या वर्षी विमान उडवत साऱ्यांना केले चकित
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 08:01 PM2021-06-25T20:01:46+5:302021-06-25T20:20:44+5:30
Motivation news : गावाच्या कन्येने १४ व्या वर्षी विमान उडवल्याच्या यशाची बातमी कोंढा येथे कळताच तिचे आजोबा केशवराव जोगदंड आणि संपूर्ण जोगदंड परिवारासह कोंढेकर ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला.
गोविंद टेकाळे
अर्धापूर(नांदेड) : नांदेड जिल्ह्यातील कोंढा या गावच्या जोगदंड कुटुंबातील १४ वर्षीय रेवा या कन्येने पायलटचे प्रशिक्षण घेत अमेरिकेत यशस्वीरीत्या विमान उडवले आहे. तिच्या या कामगिरीची माहिती मिळताच कोंढा गावात आंदोत्सव साजरा होत असून नांदेडकरांचा ऊर भरून आल्याच्या भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या आहेत. ( Nanded Farmer daughter's became pilot in US)
कोंढा येथील शेतकरी केशवराव बालाजी जोगदंड यांचा मुलगा दिलीप २० वर्षांपूर्वी अमेरिकेत शिक्षण आणि नोकरीनिमित्त गेला होता. दिलीप आणि त्यांची पत्नी दोघे मेक्निकल इंजिनीअर आहे. ते पत्नी आणि मुली सोबत टेक्सास या प्रांतात स्थायी झालेले आहेत. दिलीप यांनी 'स्ट्रिंग कंट्रोलेड प्लेन' या विषयी संशोधनकरून यशस्वी प्रयोग केले आहेत. वडिलांच्या या संशोधनातून मुलगी रेवा हिने प्रेरणा घेत बालपणापासूनच वैमानिक होण्याचे स्वप्न पाहिले. हे स्वप्न उराशी बाळगून तिने वडिलांच्या मार्गदर्शनाखाली पुढील वाटचाल सुरू केली. वैमानिक होण्याचे सर्व तांत्रिक प्रशिक्षण आणि शिक्षण घेत रेवाने अखेर दि. २० जूनला आकाशात यशस्वी झेप घेत आपले स्वप्न पूर्ण सत्यात उतरवले आहे. गावाच्या कन्येने १४ व्या वर्षी विमान उडवल्याच्या यशाची बातमी कोंढा येथे कळताच तिचे आजोबा केशवराव जोगदंड आणि संपूर्ण जोगदंड परिवारासह कोंढेकर ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला. आपल्या गावातील मुलीने अमेरिकेत जाऊन पायलट होण्याचे स्वप्न साकार केल्याबद्दल ग्रामस्थांचा ऊर अभिमानाने भरून आल्याच्या भावना यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.
नांदेडमधील शेतकऱ्याच्या लेकीचं अमेरिकेत उड्डाण; १४ व्या वर्षी विमान उडवत साऱ्यांना केले चकित #Nandedpic.twitter.com/k3Hxh2PbWe
— Lokmat (@MiLOKMAT) June 25, 2021
अधार्पूर तालुक्यातील कोंढा हे गाव अतिशय लहान असून येथील व्यवसाय हा शेती आहे. तरीही शेती व्यवसायातून येथील काही कुटुंबांनी मोठी प्रगती साधली आहे. त्याच बरोबर शेतात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नवनवीन प्रयोग केले जातात. तर येथील काही नागरिकांनी आधुनिक टेक्नॉलॉजी आत्मसात करून नवनवीन व्यवसायात यशस्वी पाऊल टाकले आहे. मागील दोन वर्षांपूर्वी राम कदम या प्रगतीशील शेतकऱ्यांनी आपल्या बहिणीला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी तिच्या लग्न समारंभात हेलीकॉप्टरमधून वरात काढून तिची सासरी पाठवणी केली होती. यामुळे कोंढा हे गाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचले होते. आता १४ वर्षीय रेवाने विमानाने आकाशास गवसणी घातल्याने कोंडा गाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
अभिमान वाटतो
रेवाने विमान उडवले याचा नक्कीच अभिमान आहे. आत्मविश्वास आणि आत्मनिर्भरता याच्या जोरावरच तिने यश मिळवले आहे. प्रत्येक स्त्रीने असाच स्वतः वरचा आत्मविश्वास आणि आत्मनिर्भरता कायम ठेवली तर यश संपादन करता येते.
- शंकरराव कदम, पोलीस पाटील कोंढा