Nanded: उमरीजवळ धावत्या बसला लागली आग; सुदैवाने सर्व ३५ प्रवासी सुखरूप
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 19:44 IST2025-04-09T19:43:33+5:302025-04-09T19:44:53+5:30
चालकाने प्रसंगावधान राखून बस थांबविली व सर्व प्रवाशांना बाहेर काढले.

Nanded: उमरीजवळ धावत्या बसला लागली आग; सुदैवाने सर्व ३५ प्रवासी सुखरूप
उमरी ( नांदेड ): उमरीहून भोकरकडे जाणाऱ्या एसटी बसला अचानक आग लागली. यामुळे प्रवाशात एकच कल्लोळ माजला. चालकाने प्रसंगावधान राखून बस थांबविली व सर्व प्रवाशांना बाहेर काढले. त्यामुळे मोठी अप्रिय घटना टळली सर्व प्रवाशांचे प्राण वाचले. या आगीमध्ये बसचे मात्र नुकसान झाले आहे. ही घटना बुधवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास घडली.
उमरी - भोकर हायवे रस्त्यावरील जिरोणा गावाजवळ धावत्या बसच्या सायलेन्सर मधून अचानक धूर निघू लागला. यावेळी बस मध्ये ३० ते ३५ प्रवासी प्रवास करीत होते. अचानक घडलेल्या या घटनेमुळे प्रवाश्यांमध्ये एकच धांदल उडाली. प्रवाशांमध्ये आरडाओरड सुरू झाली. प्रसंगावधान राखून बस थांबविली. चालकांनी सर्व प्रवाशांना बाहेर काढले. त्यामुळे मोठी अप्रिय घटना टळली. या घटनेमध्ये कुणालाही इजा झाली नाही. चालक- वाहकांनी आग विझवली.
याबाबत भोकरचे आगार प्रमुख संजय पुंडगे यांनी सांगितले की, बसच्या सायलेन्सरमधील बिघाडामुळे धूर निघाला. एसटी बसचे फारसे काही नुकसान झाले नाही. कुणालाही इजा पोहोचली नाही. घटना घडल्यानंतर सदर बसला टो करून भोकर आगारामध्ये आणण्यात आले.