नांदेडमध्ये रेल्वेत चोऱ्या करणारी अल्पवयीन मुलांची टोळी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 12:49 AM2018-06-06T00:49:28+5:302018-06-06T00:49:28+5:30
खेळण्या, बागडण्याच्या वयात चोरीसारखे गंभीर गुन्हे करणा-या अल्पवयीन मुलांच्या टोळीला रेल्वे सुरक्षा बलाने पकडले आहे़ या टोळीत अवघ्या सहा वर्षापासून ते सोळा वर्षापर्यंतच्या मुलांचा समावेश आहे़ पकडलेल्या या आठ जणांनी रेल्वेने प्रवास करणा-या महिला आणि वृद्धांना टार्गेट केले होते़ त्यांची चोरीची पद्धत ऐकून रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारीही अव्वाक झाले़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : खेळण्या, बागडण्याच्या वयात चोरीसारखे गंभीर गुन्हे करणा-या अल्पवयीन मुलांच्या टोळीला रेल्वे सुरक्षा बलाने पकडले आहे़ या टोळीत अवघ्या सहा वर्षापासून ते सोळा वर्षापर्यंतच्या मुलांचा समावेश आहे़ पकडलेल्या या आठ जणांनी रेल्वेने प्रवास करणा-या महिला आणि वृद्धांना टार्गेट केले होते़ त्यांची चोरीची पद्धत ऐकून रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारीही अव्वाक झाले़
रेल्वेतून दागिने, मोबाईल लंपास झाल्याच्या अनेक घटना घडतात़ परंतु त्यापैकी मोजक्याच तक्रारी ठाण्यापर्यंत येतात़ प्रवाशांना प्रवासात नेमक्या कोणत्या ठिकाणी चोरी झाली हे बहुतेक वेळी लक्षात राहत नाही़ त्यात चोरटे जर अल्पवयीन असतील तर त्यांच्यावर सहसा संशयही येत नाही़ याचाच फायदा घेत गेल्या काही दिवसांपासून नांदेड ते औरंगाबाद प्रवास करणा-या महिला व वृद्धांना टार्गेट करणारी एक अल्पवयीन मुलांची टोळी सक्रिय झाली होती़ गर्दी असणा-या रेल्वे गाड्यांची त्यासाठी त्यांनी निवड केली होती़ गर्दीचा फायदा घेत चलाखीने ते प्रवाशाचा ऐवज लंपास करीत होते़
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने हे प्रकार घडत असल्यामुळे रेल्वे सुरक्षा बलही हैराण झाले होते़ याचा छडा लावण्यासाठी त्यांनी खब-याचे नेटवर्क वापरले़ त्यानंतर खब-याकडून या टोळीची सुरक्षा बलाचे पोनि़नवीन प्रतापसिंह यांना माहिती मिळाली़ त्यानंतर काही दिवस त्यांनी कर्मचा-यांना या अल्पवयीन मुलांवर पाळत ठेवण्याच्या सूचना दिल्या़ २ जून रोजी नंदीग्राम एक्स्प्रेस निघण्याच्या वेळी या अल्पवयीन मुलांना चोरी करताना रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचा-यांनी पकडले़ एकूण आठ अल्पवयीन मुले यावेळी नंदीग्राम एक्स्प्रेसमध्ये हातसफाईसाठी तयार होते़ पोनि़नवीन प्रतापसिंह यांनी या सर्व अल्पवयीन मुलांची चौकशी केली असता ही मुले औरंगाबाद, जालना, सिल्लोड अशा वेगवेगळ्या भागांतील असल्याचे समजले़ एकदा मोहीम फत्ते झाल्यानंतर ते आपल्या गावी परत जात होते़ त्यानंतर चोरीसाठी ते पुन्हा एकत्र जमत़ त्यांच्याकडे चोरीतील कुठलाही मुद्देमाल मात्र मिळाला नाही़ त्यानंतर त्यांना चाईल्ड लाईनच्या ताब्यात देण्यात आले़ दरम्यान, चिमुकल्या मुलांची ही टोळी चालविणारा कुणीतरी प्रमुख असून त्याचाही शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोनि़ नवीन प्रतापसिंह यांनी दिली़
---
अशी होती चोरीची पद्धत
आठ अल्पवयीन मुलांची ही टोळी नजरेनेच आपले सावज हेरत होते़ त्यानंतर प्रत्यक्ष चोरी करणारा वेगळा आणि त्याच्या सुरक्षेसाठी म्हणून इतर सर्व जण आजूबाजूला कडे करीत होते़ एकाने हातसफाई केल्यानंतर तो ऐवज लगेच दुस-याकडे नंतर तिस-याकडे असे करीत काही सेकंदात ही अल्पवयीन मुले चलाखीने आपली मोहीम फत्ते करीत होते़ त्यांची चोरीची ही पद्धत पाहून कर्मचारीही अवाक् झाले़
---
समुपदेशनाची गरज
रेल्वेस्टेशनवर यापूर्वीही अनेकवेळा अल्पवयीन मुलांना चोरी करताना पकडण्यात आले आहे़ आर्थिक परिस्थिती आणि शिक्षणाचा अभाव यामुळे ही मुले कोवळ्या वयातच गुन्हेगारीकडे वळतात़ त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समुपदेशनाची गरज आहे़ त्यासाठी स्वयंसेवी संस्थांनीही पुढाकार घ्यावा, असे आवाहन नवीन प्रतापसिंह यांनी केले़