नांदेड शासकीय रुग्णालयातील सिटी स्कॅन कक्षाचे टाळे उघडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 12:48 AM2018-11-18T00:48:52+5:302018-11-18T00:49:47+5:30
डॉ़ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील सिटी स्कॅन मशीनच्या कक्षाला गेल्या तीन महिन्यांपासून टाळे ठोकण्यात आले होते़ अंतर्गत वादात दुरुस्तीअभावी ही मशीन बंदच होती़
नांदेड : विष्णूपुरी येथील डॉ़ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील सिटी स्कॅन मशीनच्या कक्षाला गेल्या तीन महिन्यांपासून टाळे ठोकण्यात आले होते़ अंतर्गत वादात दुरुस्तीअभावी ही मशीन बंदच होती़ त्यामुळे रुग्णांचे हाल होत होते़ याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित केल्यानंतर तातडीने पावले उचलत या मशीनची दुरुस्ती करण्यात आली असून रुग्णांची तपासणीही करण्यात आली़
डॉ़शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे विष्णूपुरी येथे स्थलांतरण होण्यापूर्वीच काही महिने अगोदर कोट्यवधी रुपयांची अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन खरेदी करण्यात आली होती़ परंतु रुग्णालयात जुनी मशीन असल्यामुळे नवीन मशीन अनेक महिने कार्यान्वितच करण्यात आली नाही़ रुग्णालय व महाविद्यालयाचे विष्णूपुरी येथे स्थलांतरण झाल्यानंतर या ठिकाणी नवीन मशीनवरील धूळ झटकण्यात आली़ परंतु तोपर्यंत बरेचसे पाणी पुलाखालून वाहून गेले होते़ या ठिकाणी ही मशीन सुरु कमी अन् बंदच जास्त दिवस राहत होती़ मशीनची देखभाल आणि दुरुस्ती करणारी कंपनी आणि महाविद्यालय प्रशासन यामध्ये दुरुस्तीच्या खर्चावरुन मतभेद झाले होते़ त्याचा फटका मात्र गरीब रुग्णांना बसत होता़
याच कारणामुळे सप्टेंबर महिन्यापासून ही मशीन बंद होती़ त्यामुळे रुग्णांना हजारो रुपये खर्च करुन बाहेरुन ही तपासणी करावी लागत होती़ त्यात अत्यवस्थ असलेल्या रुग्णांना सिटी स्कॅन तपासणीसाठी विष्णूपुरी येथून पुन्हा शहरात आणणे जिकरीचे होते़ परंतु या प्रकाराबाबत प्रशासन आणि लोकप्रतिनिधी फारसे गंभीर नसल्याचाच आजपर्यंतचा अनुभव आहे़ याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित केल्यानंतर महाविद्यालय प्रशासनाने तातडीने कंपनीशी संपर्क साधला़ त्यानंतर या मशीनची दुरुस्ती करण्यात आली़