नांदेड धान्य घोटाळा: आरोपीचा जामीन फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 12:40 AM2018-08-10T00:40:26+5:302018-08-10T00:40:52+5:30
शासकीय अन्न-धान्य गोदामात न पाठवता परस्पर अॅग्रो कंपनीत पाठवणाऱ्या प्रकरणातील मॅनेजरचा अटकपूर्व जामीन बिलोलीच्या जिल्हा सत्र न्यायालयाने गुरुवारी फेटाळला़ सदरील प्रकरणात अजून दहापेक्षा जास्त आरोपी फरार आहेत़
लोकमत न्यूज नेटवर्क
बिलोली : शासकीय अन्न-धान्य गोदामात न पाठवता परस्पर अॅग्रो कंपनीत पाठवणाऱ्या प्रकरणातील मॅनेजरचा अटकपूर्व जामीन बिलोलीच्या जिल्हा सत्र न्यायालयाने गुरुवारी फेटाळला़ सदरील प्रकरणात अजून दहापेक्षा जास्त आरोपी फरार आहेत़
गेल्या जुलै महिन्यात नांदेडच्या एफसीआय गोदामातून निघालेले गहू व तांदळाचे ट्रक तालुका पातळीवरील न जाता कृष्णूर येथील औद्योगिक वसाहतमध्ये एका अॅग्रो कंपनीत शिरले़ बºयाच दिवसापासून धान्याचा काळाबाजार होत असल्याची कुणकुण पोलिसांना होती़ १८ जुलैच्या रात्री पोलिस नांदेड-कृष्णूर मार्गावर पाळत ठेवून होते़ सदरील घोटाळा प्रकरणात दहा ट्रक पकडण्यात आले़ अॅग्रो कंपनीसह शासकीय वाहतूक ठेकेदार व अन्य दहा जणांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल झाला़ अन्नधान्य काळा बाजाराचा व घटनेचा तपास धर्माबादचे सहाय्यक पोलिस अधीक्षक नुरुल हसन करीत आहेत़ अद्यापही सर्व आरोपी फरार आहेत़ कंपनीला सील ठोकून सर्व महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत़
घटनेतील आरोपी व धान्य कंपनीत रिकामे करून घेण्याची जबाबदारी असलेले मॅनेजर जयप्रकाश तापडिया याने बिलोली जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता़ बुधवारी सरकार व बचाव पक्षात जोरदार युक्तीवाद झाला़ पोलिसांच्या दहा पानी से रिपोर्टमध्ये सविस्तर चौकशी अहवाल न्या़ एस़बी़ कचरे यांच्या न्यायालयात सादर झाला़ सरकार पक्षाकडून धान्य घोटाळ्यातील संपूर्ण कार्यवाही, अॅग्रो कंपनीतील जप्त केलेली कागदपत्रे, पोलिसांनी एफसीआय गोदाम ते पुरवठा विभागाची जीपीएस पद्धती, गहू-तांदळाच्या पेन्सीलने लिखित बनावट नोंदी असे पुरावे दाखल करून जामिनाला कडाडून विरोध केला़ शासकीय अन्नधान्याची सीमावर्ती भागातून होणारी विल्हेवाट मोठी व्याप्ती असून मॅनेजरला जामीन दिल्यास पुढील तपासात अडचणी ठरतील़ अजून पुरवठा विभागाचीही चौकशी शिल्लक असल्याचा युक्तीवाद मांडला़ गुरुवारी न्या़एस़बी़ कचरे यांनी प्रकरणातील पहिला जामीन अर्ज फेटाळला़ सरकार पक्षाची बाजू अॅड़ दिलीप कुलकर्णी यांनी मांडली़ निकालाकडे सर्वांचे लक्ष होते.
---
दहापेक्षा जास्त आरोपी फरार
धान्य घोटाळ्यात दहापेक्षा जास्त आरोपी अद्यापही फरार आहेत.
पोलिसांचा दहा पानांचा चौकशी अहवाल
घोटाळ्याचे पुरावे दाखल करुन सरकारी वकिलांनी जामीनाला केला कडाडून विरोध
पुरवठा विभागाची होणार चौकशी