'समृद्धी'ला जोडणारा नांदेड-जालना महामार्ग सिमेंटचाच हवा; काम बंद पाडण्याचा चव्हाणांचा इशारा
By प्रसाद आर्वीकर | Published: June 1, 2023 07:30 PM2023-06-01T19:30:56+5:302023-06-01T19:32:10+5:30
मराठवाड्यासाठी निकष का बदलला..? माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचा इशारा
नांदेड : समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या नांदेड- जालना द्रुतगती महामार्गाच्या मूळ मंजुरीत कोणताही बदल न करता हा रस्ता सिमेंट काँक्रीटचाच झाला पाहिजे. मराठवाड्यावर असा अन्याय होत राहिला तर रस्त्याचे काम बंद पाडू, असा इशारा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी दिला आहे.
तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना अशोकराव चव्हाण यांनी नांदेड- जालना द्रुतगती महामार्गाला मंजुरी दिली होती. या मात्र महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) सिमेंट काँक्रिट ऐवजी डांबरी रस्ता तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.
ही माहिती अशोकराव चव्हाण यांना समजल्यानंतर त्यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिल्या. मूळ आराखड्यात सिमेंट काँक्रिटचाच हा रस्ता व्हावा, अशी मंजुरी आहे. त्यानुसार हा रस्ता सिमेंट काँक्रिटचाच होणे आवश्यक आहे. एमएसआरडीसीचे कार्यकारी संचालक राधेशाम मोपलवार यांच्याशी बोलणे झाले आहे. मूळ मंजुरीत बदल न करता हा महामार्ग सिमेंट काँक्रिटचाच करावा, अशी सूचना केली आहे. डांबरी रस्ते जास्त काळ टिकत नाहीत. एक-दोन वर्षांत खड्डे पडतात. तेव्हा हा रस्ता सिमेंट काँक्रिटचा न करता मराठवाड्यावर अन्याय का? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.
नांदेड : समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या नांदेड- जालना द्रुतगती महामार्गाच्या मूळ मंजुरीत कोणताही बदल न करता हा रस्ता सिमेंट काँक्रीटचाच झाला पाहिजे. मराठवाड्यावर असा अन्याय होत राहिला तर रस्त्याचे काम बंद पाडू, असा इशारा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी दिला आहे. pic.twitter.com/KuLAZdySLb
— Lokmat (@lokmat) June 1, 2023
निकष का बदलला..?
मराठवाड्यातील जमीन सिमेंट काँक्रिटसाठी अनुकूल नाही, असा निष्कर्ष एमएसआरडीसीने काढला आहे. पण, राष्ट्रीय महामार्ग सिमेंट काँक्रिटचे झालेत. मग याच रस्त्यासाठी निकष का बदलला? असा सवाल चव्हाण यांनी उपस्थित केला.