नांदेड जि़प़ चा शिक्षक गौरव सोहळा लांबणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 12:31 AM2018-09-05T00:31:15+5:302018-09-05T00:31:44+5:30
जिल्हा परिषदेच्या वतीने यंदा जिल्ह्यातील ३३ शिक्षकांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात येणार होते. या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अनुषंगाने शिक्षण विभागाच्या वतीने तयारीही सुरू करण्यात आली होती. मात्र पुरस्कारार्थी शिक्षकांच्या याद्यांचा तिढा न मिटल्याने हा पुरस्कार लांबणीवर टाकण्याची नामुष्की शिक्षण विभागावर आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : जिल्हा परिषदेच्या वतीने यंदा जिल्ह्यातील ३३ शिक्षकांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात येणार होते. या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अनुषंगाने शिक्षण विभागाच्या वतीने तयारीही सुरू करण्यात आली होती. मात्र पुरस्कारार्थी शिक्षकांच्या याद्यांचा तिढा न मिटल्याने हा पुरस्कार लांबणीवर टाकण्याची नामुष्की शिक्षण विभागावर आली आहे.
शिक्षक दिनानिमित्त ५ सप्टेंबर रोजी शिक्षक गौरव सोहळा घेवून यात जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण करण्यात येते. मध्यंतरी ही परंपरा विस्कळीत झाली होती. सलग दोन वर्षे पुरस्कार वितरण सोहळे न घेतल्याने शिक्षकांसह समाजातील इतर घटकांतूनही नाराजी व्यक्त होत होती. या पार्श्वभूमीवर मागील वर्षी शिक्षण विभागाने पुढाकार घेवून तीन वर्षांतील शिक्षक पुरस्काराचे एकाचवेळी वितरण केले होते. त्यानंतर यंदापासून हा पुरस्कार वितरण सोहळा सुरळीत होईल, अशी अपेक्षा होती.
यंदा या पुरस्कारासाठी जिल्ह्यातून ८६ प्रस्ताव प्राप्त झाले होते. यातील ५४ प्रस्ताव शिक्षण विभागाच्या पडताळणीतच बाद झाले. उर्वरित ३६ प्रस्तावांतून शिक्षकांची निवड करायची होती. जिल्हा निवड समितीकडून हे प्रस्ताव आयुक्तांकडे मंजुरीसाठीही पाठविले. मात्र ही प्रक्रिया वेळेत पार न पडल्याने यंदा पुरस्कार वितरणाचा ५ सप्टेंबरचा मुहूर्त टळला आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी शासनाचा निधी नसतो तर यासाठीचा खर्च सेस फंडातून केला जातो. पुरस्कारासाठी निवड होणाऱ्या शिक्षकांचे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र पोलीस अधीक्षक कार्यालयातून द्यावे लागते. या सर्व प्रक्रियेत वेळ गेल्याने ५ सप्टेंबर रोजीचे वितरण लांबणीवर टाकण्याची नामुष्की प्रशासनावर आली.
दरम्यान, येत्या १३ सप्टेंबर रोजी पुरस्कार वितरण सोहळा घेण्याबाबत प्रशासनाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. मात्र याची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.
मनपाचे गुरुगौरव आणि कार्यगौरव पुरस्कार जाहीर
नांदेड महानगरपालिकेच्या वतीने १५ प्राथमिक व २ माध्यमिक शाळा चालविले जातात. मनपाच्या वतीने यंदाही मनपास्तरीय गुरुगौरव आणि कार्यगौरव पुरस्कारांची निवड करण्यात आली असून हा पुरस्कार वितरण सोहळा बुधवार, ५ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता मनपाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत होणार आहे. यावर्षी मराठी माध्यमातून मारोती चंद्रराव कांबळे, साईनाथ सुधाकर चिद्रावार, उर्दू माध्यमातून संजीदा मुजम्मील गफूर, अब्दुल गणी मो. इमामोद्दीन तर कार्यगौरव पुरस्कारासाठी उर्दू माध्यमातून शेख रहीम शेख अहेमद आणि मराठी माध्यमातून गोदावरी राजेंद्र गज्जेवार यांची निवड करण्यात आली आहे.