नांदेडमध्ये न्यायालय परिसरात तरूणाची तलवारीने हत्या, पोटगीच्या वादातून मेव्हण्याने केला हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2017 12:39 AM2017-09-27T00:39:09+5:302017-09-27T00:40:12+5:30
शहरातील शिवाजी पुतळा भागात असलेल्या कौटुंबिक न्यायालय परिसरात पोटगीच्या वादातून औरंगाबादच्या युवकावर मेव्हण्याने तलवारीने हल्ला केल्याची घटना मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली.
नांदेड : शहरातील शिवाजी पुतळा भागात असलेल्या कौटुंबिक न्यायालय परिसरात पोटगीच्या वादातून औरंगाबादच्या युवकावर मेव्हण्याने तलवारीने हल्ला केल्याची घटना मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. उपचारादरम्यान या युवकाचा मृत्यू झाला़. हरबनसिंग दारकसिंग शिलेदार (३०,रा़ अजबनगर, औरंगाबाद) असे मृताचे नाव आहे. हल्लेखोर विक्रमजितसिंग लिखारी याला पोलिसांनी अटक केली.
हरबनसिंगचे आपल्या पत्नीसोबत पटत नव्हते़ हे प्रकरण २०१३पासून नांदेडच्या कौटुंबिक न्यायालयात सुनावणीस होते. पोटगीवरुन दोन्ही कुटुंबात नेहमी वाद होत असे. नांदेडमधील चिखलवाडी हे तिचे माहेर. पतीसोबत वाद झाल्याने पाच महिन्यांपासून ती माहेरीच राहत होती. याच प्रकरणासाठी मंगळवारी हरबनसिंग औरंगाबादवरुन आपला भाऊ प्रीतपालसिंगसोबत येथील कौटुंबिक न्यायालयात आला होता़ सुनावणी झाल्यानंतर पायºयावरुन उतरत असतानाच त्याच्या पत्नीचा भाऊ विक्रमजितसिंग लिखारी समोर आला व काही कळण्याच्या आत तलवारीने हल्ला चढविला. हरबनसिंगच्या हात, पोट आणि खांद्यावर त्याने हल्ला चढविला़ हल्ल्यानंतर हरबनसिंग रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्याचवेळी हरबनसिंगचा भाऊ तिथे आला व त्याने इतरांच्या मदतीने शिवाजी पुतळ्यापर्यंत त्याला आणले. तेथून त्याला विष्णूपुरी येथील शासकीय रूग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी हरबनसिंगला मृत घोषित केले. या घटनेनंतर न्यायालयाच्या पाय-या पूर्णपणे रक्ताने माखल्या होत्या.
घटनेनंतर विक्रमजितसिंग फरार झाला. याप्रकरणी वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. घटनेनंतर तीन तासांनी विक्रमजितसिंगला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
चार वर्षांपूर्वी झाले होते लग्न
औरंगाबाद येथील अजबनगर भागातील भगवान शाळेजवळ हरबनसिंग राहायचा. आई, वडील, एक भाऊ आणि एक बहीण असे त्याचे कुटुंब. त्याचे वडील रिक्षा चालवायचे. हरबनसिंग इलेक्ट्रिशियनचे काम करायचा. चार वर्षांपूर्वी त्याचे लग्न झाले होते. न्यायालयात तारीख असल्याने तो मोठा भाऊ प्रीतपालसिंगसोबत नांदेडला गेला होता. सर्वसाधारण आर्थिक परिस्थिती असलेले शिलेदार कुटुंब मितभाषी असल्याचे शेजा-यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
तडजोड झाली होती पण...
काही वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी न्यायालयात या प्रकरणात पत्नीसोबत तडजोड झाली होती. त्यामुळे लवकरच हा वाद मिटणार होता.पण नियतीला हे मान्य नव्हते. दसºयानंतरची तारीख घेऊन तो बाहेर पडत असतानाच मेव्हण्याने त्याचा काटा काढला.